माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रमाणपत्रासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच द्यावी लागली ! – विशाल, तमिळ अभिनेते

7

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील अभिनेते विशाल यांनी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या मुंबईतील अधिकार्‍यांवर त्यांच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला प्रमाणित करण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशाल यांचा ‘मार्क अँटनी’ हा तमिळ भाषेतील चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. त्याच्या हिंदी आवृत्तीसाठी लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशाल यांनी सामाजिक माध्यमांतून स्वतःचा एक व्हिडिओ प्रसारित करून आरोप केले आहेत. ‘या चित्रपटासाठी बरेच काही पणाला लागल्यामुळे माझ्याकडे लाच देण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता’, असा दावाही त्यांनी केला आहे.

विशाल यांनी पुढे म्हटले की, चित्रपटगृहाच्या पडद्यावर भ्रष्टाचार दाखवणे ठीक आहे; पण खर्‍या आयुष्यात तो पचवता येत नाही. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये आणि केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या मुंबई कार्यालयात याहून वाईट घडत आहे. ‘मार्क अँटनी’ या माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मला २ व्यवहारांमध्ये साडेसहा लाख रुपये द्यावे लागले. यांपैकी मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ३ लाख रुपये आणि प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाख रुपये दिले.

या वेळी विशाल यांनी लाच देण्याविषयीचा तपशीलही व्हिडिओमध्ये दिला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.