शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणा अंतर्गत होणार नसल्याचा निर्णय

75

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने तूर्तास राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाअंतर्गत होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मराठा आरक्षणामुळं अकरावी तसेच आयटीआय असे अनेक शैक्षणिक प्रवेश अद्यापही रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार? असा सवाल विचारला जात आहे. यापार्श्वभूमीवर याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता खुल्या गटातून त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी एसईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.एका बाजूला मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन केले जात आहे. तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याने आणखी हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. SEBC मधून प्रवेश घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

संदर्भ व अधिक माहिती – dailyhunt व महाराष्ट्र देशा