NDA Meeting Updates
NDA Elects Narendra Modi as Parliamentary Leader, Endorsed by CM and Deputy CMs

नवी दिल्ली – एनडीए संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि एनडीएतील सर्व घटक पक्षांनी याला अनुमोदन दिले. यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना अनुमोदन देण्यासाठी मंचावर उभे राहत, “भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. नरेंद्र मोदी यांना एनडीए संसदीय नेतेपदी निवडण्यासाठी राजनाथ सिंहांनी जो प्रस्ताव मांडला आहे, त्या प्रस्तावाला मी शिवसेनेकडून अनुमोदन देतो. गेल्या 10 वर्षांत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाचा विकास केला आणि देशाचे नाव जगभरात पोहोचवले.”

अजित पवार यांनीही नरेंद्र मोदी यांच्या निवडीचा प्रस्तावाला अनुमोदन दिले. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि इतर घटक पक्षांचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते. शिवसेना आणि भाजप युतीबद्दल मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिवसेना-भाजपची युती हा ‘फेविकॉल का जोड’ आहे, तो कधीही तुटणार नाही.”