बलिप्रतिपदा महत्त्व , दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक

180

बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पावलाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने ‘‘तिसरा पाऊल कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्‍याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.

आध्यात्मिक महत्त्व : ‘बलीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्‍विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते अन् धर्माचरण करणार्‍या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते. ‘हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल’, असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला, तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून भगवंताची ‘तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व’ हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.

दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.

आध्यात्मिक महत्त्व : अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहुर्तांना ईश्‍वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.

सण साजरा करण्याची पद्धत

अ. बलीचे पूजन करणे : बलीप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात.

आध्यात्मिक महत्त्व : थोर विष्णुभक्त या नात्याने बली आणि त्याची पत्नी यांचे पूजन करण्याचे विधान धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे पूजकामध्ये बलीसारखी विष्णुभक्ती निर्माण होण्यास साहाय्य मिळते. बलीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्यराजा संतुष्ट होतो आणि दीपदान करणार्‍या व्यक्तीला दैत्यांच्या उपद्रवापासून अभयदान प्राप्त होते. बलीराजाला पृथ्वीच्या सृजनशीलतेचे प्रतीक असणार्‍या वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणार्‍या व्यक्तीवर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट रहाते.

आ.  पत्नीने पतीला ओवाळणे : या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात.

आध्यात्मिक महत्त्व : पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रगट होते. अशा प्रकारे औक्षण केल्यामुळे पती-पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

इ. भोजन : दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात.

आध्यात्मिक महत्त्व : ब्राह्मणभोजन घातल्याने धर्मदेवता प्रसन्न होते. या दिवशी विशेष पक्वाने बनवल्यामुळे वातावरणात कार्यरत झालेली विष्णुतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी पक्वान्नांमध्ये आकृष्ट होतात.

र्इ. मौजमजा करणे : ‘बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्यभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात.

आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी असात्त्विक पेय किंवा पदार्थ यांचे सेवन करू नये आणि स्त्रीचा उपभोग घेऊ नये. जिवाने अशा प्रकारे कृती केल्यामुळे त्याचा आचार शुद्ध होऊन त्याच्या मनावर सात्त्विकतेचा संस्कार दृढ होतो. तसेच इंद्रियांवर संयम मिळवल्याने इंद्रियनिग्रह साध्य होण्यास साहाय्य होते. अशा  प्रकारे सात्त्विक कर्म केल्यामुळे जिवामध्ये सुप्त असणारी सात्त्विक वृत्ती जागृत होते. ‘सत्त्वगुणाला अनुसरून मौजमजा करून सात्त्विक सुखाची प्राप्ती करण्यास काहीच हरकत नाही’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

उ. गोवर्धनपूजा : या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

आध्यात्मिक महत्त्व : गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याच्यामध्ये ४ टक्के कृष्णतत्त्व असून श्रीकृष्णाची १० टक्के तारक आणि १० टक्के मारक शक्ती कार्यरत आहे. गोवर्धनपूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणार्‍या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते.

संदर्भ व अधिक माहिती – सनातन संस्था