शालेय शिक्षकांचं लसीकरण प्राधान्यानं

42

देशभरातल्या शालेय शिक्षकांचं लसीकरण प्राधान्यानं करण्यासाठी केंद्रसरकार या आठवड्यात कोविड प्रतिबंधक लशींच्या २ कोटी अतिरिक्त मात्रा पुरवणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी शिक्षकांविषयी माहिती गोळा करण्यासाठी एकीकृत जिल्हा माहिती यंत्रणा उपयोगात आणावी, आणि राज्य शिक्षण विभाग, केंद्रीय विद्यालय संघटना तसंच नवोदय विद्यालय संघटना यांच्याशी समन्वय राखावा. त्यामुळे लसीकरण मोहिमेला आवश्यक गती येईल, असं ते म्हणाले. 

 या बैठकीत कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्य़ा प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि दुसरी मात्रा देण्याचं प्रमाण वाढवण्यावर, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर द्यावा, आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात असा सल्ला त्यांनी राज्यांना दिला. लशींचा पुरेसा साठा राखण्याच्या धोरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाली.