मुक्तविद्यापीठ प्रवेश मुदतवाढ

85

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांकरीता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत कोरोना संसर्गाच्‍या पार्श्वभुमिवर विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्‍या मुदतीत वाढ केली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक पात्र विद्यार्थ्यांना येत्‍या रविवार (ता.१५) पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना शुल्‍क दोन टप्‍यांत भरण्याची विशेष सवलत उपलब्‍ध केली आहे.

बी.एड. प्रथम वर्ष, एमबीए व कृषी शिक्षणक्रम वगळून अन्‍य अभ्यासक्रमांकरीता वाढीव मुदतीत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. गेल्‍या २१ जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

३१ ऑक्‍टोबरला मुदत संपत असतांना राज्‍यभरात कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्‍या नुकसानीतून विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये याकरीता मुदतवाढ दिली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्‍या परीस्‍थितीत अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत आलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन एकरकमी शिक्षणक्रम शुल्‍क भरण्यात अडचण असलेल्‍या विद्यार्थ्यांना दोन टप्यांत शुल्‍क भरण्याची सुविधा उपलब्‍ध केली आहे.

आर्थिक समस्‍या असलेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या शिक्षणात खंड पडू नये याकरीता शिक्षणक्रमाच्‍या एकूण शुल्‍कापैकी विद्यापीठाचा हिस्सा दोन टप्यांत भरण्याची विशेष सुविधा विद्यापीठाने उपलब्‍ध केली आहे. ऑनलाइन अर्ज भरतांना शुल्‍क आदा करण्यासंदर्भात पर्याय उपलब्‍ध होतील. दोन टप्यांत शुल्‍क भरण्याचा पर्याय निवडलेल्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठ शुल्‍काचा दुसरा टप्पा ३१ जानेवारी २०२१ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्‍या लॉगिंन आयडी आणि पासवर्ड वापरुन भरता येईल. दोन्ही टप्‍यातील शुल्‍क भरल्‍यानंतरच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित समजले जातील असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.