Home Crime ऑपरेशन मुस्कान अंतर्गत नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीची सुटका; आरोपीला अटक

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीची सुटका; आरोपीला अटक

0
News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत नाशिक शहरात पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिची सुरक्षित सुटका केली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ कडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संबंधित मुलगी आणि संशयित आरोपी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार एक विशेष पथक तयार करून घटनास्थळी पाठविण्यात आले. या पथकाने स्थानिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली.

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित मुलगी आणि आरोपी हे धरणाच्या बॅकवॉटरजवळील एका झोपडीत राहत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विलास भाउसाहेब जाधव (वय १८, रा. पाथर्डी शिवार, नाशिक) याला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली.

सुटका केलेल्या मुलीला व आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ च्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अशा प्रकारच्या कारवाया सुरू असून, बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.