नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती शासकीय अंडी उबवणी केंद्रात मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर तपासणी करण्यात आली. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या तपासणीत बर्ड फ्लू (एव्हियन इन्फ्लूएंझा) संसर्गाची अधिकृत पुष्टी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत सुमारे एक हजार कोंबड्यांचा नाश केला आहे. तसेच, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रातील सुमारे १४ हजार अंडी देखील नष्ट करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले.
संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. संबंधित केंद्राच्या एक किलोमीटर परिसरात कृषी प्रदर्शन तसेच पशू-प्राण्यांशी संबंधित सर्व कार्यक्रमांवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय, ९ किलोमीटरचा परिसर ‘निगराणी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला असून या भागातील इतर पक्ष्यांची तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पक्ष्यांच्या स्त्रावाशी संपर्क टाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. आजारी किंवा निष्क्रिय दिसणाऱ्या पक्ष्यांच्या जवळ जाणे टाळावे.
तसेच, कुक्कुटपालन करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या अन्न-पाण्याची भांडी दररोज निर्जंतूक करावीत. कच्चे मांस हाताळताना हातमोजे वापरणे आवश्यक आहे. मृत पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षेबाबतही प्रशासनाने मार्गदर्शन केले आहे. अर्धवट शिजलेले अंडे किंवा कच्चे मांस खाणे टाळावे. मांस पूर्णपणे शिजवून, म्हणजेच किमान १०० अंश सेल्सिअस तापमानावर तयार केल्यावरच सेवन करावे, असे सांगण्यात आले आहे.
नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा हा उद्रेक लक्षात घेता प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.








