आज, दिनांक ११ मे २०२५ रोजी सायंकाळी भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एक महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली — पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन करून शस्त्रसंधीची विनंती केली. ही मागणी पाकिस्तानकडून आली, हेच ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे द्योतक आहे.

भारताचे हे ऑपरेशन केवळ सैनिकी कारवाई नव्हे, तर दहशतवादाविरुद्धचा एक स्पष्ट आणि निर्णायक संदेश आहे. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना थेट त्यांच्या अड्ड्यांवर जाऊन मारण्याचे धाडस भारताने दाखवले. १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा आणि पाकिस्तानकडून झालेल्या सर्व हल्ल्यांना दिलेले कडवे प्रत्युत्तर — यामुळे आज आपण केवळ आपली हद्द सुरक्षित केली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ताकद दाखवली आहे.

या विजयाचे महत्त्व इतके आहे की, पाकिस्तानसारखा देश, जो कायम युद्धाची भाषा बोलतो, त्याला आज शांततेची विनंती करावी लागली. हे भारताच्या मुत्सद्देगिरीचे आणि सैन्यशक्तीचे फलित आहे.

परंतु या पार्श्वभूमीवर देशांतर्गत राजकारणात जो विरोध दिसतो आहे, तो दुर्दैवी आहे. ऑपरेशन सुरू असताना सरकारसोबत उभे असलेले विरोधी पक्ष आता मात्र शस्त्रसंधी झाल्यावर सरकारवर टीका करू लागले आहेत. हा दुटप्पीपणा न स्वीकारण्याजोगा आहे. दहशतवाद्यांचा नायनाट हाच देशाचा हेतू होता आणि तो आपण साध्य केला आहे. ऑपरेशन पूर्णतः थांबलेले नसून ते उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत सुरु राहणार आहे. विशेषतः पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेले चार अतिरेकी अजूनही शोधात असून, त्यांचाही लवकरच खातमा होईल, हे निश्चित.

या संपूर्ण प्रकरणातून भारताने जगाला दोन गोष्टी स्पष्टपणे दाखवून दिल्या आहेत — आपली सैनिकी ताकद आणि दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका.

आजचा दिवस भारताच्या विजयाचा आहे. देशासाठी झटणाऱ्या आपल्या सैन्याला सलाम आणि राष्ट्रहितासाठी एकसंघ राहण्याची आज गरज आहे.

— संपादकीय विभाग
[thalaknews.com]