हिंदू धर्मात शनिदेवाला कर्म, न्याय आणि शिस्त यांचे प्रतीक मानले जाते. यंदा १६ मे २०२६ रोजी वैशाख अमावास्येच्या दिवशी ‘शनैश्चर जयंती’ आणि ‘शनि अमावस्या’ हे दोन महत्त्वाचे धार्मिक योग एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व वाढले आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाचे तत्त्व अत्यंत प्रभावी स्वरूपात कार्यरत असते आणि श्रद्धेने केलेली उपासना लवकर फलदायी ठरते.

जन्मस्थान : भारतातील सौराष्ट्रात वैशाख अमावास्येला माध्यान्ही शनिदेवाचा जन्म झाला; म्हणून या दिवशी ‘शनैश्चर जयंती’ साजरी करतात.

कार्यक्षेत्र : महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर (जिल्हा अहिल्यानगर) येथे शनीची मोठी काळी शिळा असून तेथे शनिदेवाची शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे ‘शनि शिंगणापूर’ हे शनीचे कार्यक्षेत्र आहे. शनैश्चर जयंतीला शनि शिंगणापूर येथे जत्रा भरते आणि शनिदेवाचा उत्सव साजरा होतो.

शनिदेवाची अन्य नावे : सूर्यसुत, बभ्रुरूप, कृष्ण, रौद्रदेह, यमसंज्ञ, सौर्य, मंदसंज्ञ, शनैश्चर, बिभीषण, छायासुत, संवर्तक, ग्रहराज, रविनंदन, मंदगती, नील, कोटराक्ष, सूर्यपुत्र, आदित्यनंदन, नक्षत्रगणनायक, नीलांजन, कृतांत, धनप्रदाता, सर्वकर्मावरोधक, कामरूप, महाकाय, महाबल, कालात्मा, छायामार्तंड इत्यादी.

शनिलोक : ज्याप्रमाणे ग्रहमालिकेत शनि ग्रह सूर्यापासून पुष्कळ दूर आहे, त्याप्रमाणे सूक्ष्मातील शनिलोकही सूर्यलोकापासून पुष्कळ दूर आहे. शनिलोकात सूर्यकिरणांचा अभाव असल्यामुळे तेथे पुष्कळ अंधार असतो. शनिदेव शनीचा अपमान करणार्‍या पापी लोकांना शनिलोकात नेऊन दंडित करतो.

शनिदेवाशी संबंधित रंग : तमप्रधान कर्माचा लय करण्यासाठी आणि जिवांना कठोरपणे दंडित करण्यासाठी शनिदेवाने उग्र रूप घेतले. त्याचे द्योतक असणारा काळा किंवा गडद निळा, हे रंग शनिदेवाशी संबंधित आहेत.

शनिदेवाशी संबंधित वस्त्राचा रंग : काळ्या रंगातून शनितत्त्व कार्यरत होते. त्यामुळे  शनीशी संबंधित वस्त्राचा रंग काळा आहे. (नवग्रह मंडलातील संबंधित देवतांसाठी वापरलेले तांदुळ आणि वस्त्र यांचा रंग त्या त्या देवतांच्या रंगाशी (वर्णाशी) संबंधित आहे; म्हणून धार्मिक विधीच्या ठिकाणी नवग्रह मंडलाची स्थापना करतांना त्या त्या रंगाची वस्त्रे, अक्षता, पुष्पे इत्यादी वापरली जातात.)

शनिदेवाचा वर्ण : शनिदेवाचा वर्ण ‘अंत्यज’, म्हणजे लयकारी आहे. त्याच्याकडून मारक शक्तीचे पुष्कळ प्रक्षेपण होते. त्यामुळे त्याचे स्वरूप उग्र जाणवते.

शनिदेवाशी संबंधित तत्त्व : शनीचा संबंध पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाशी आहे.

शनिदेवाशी संबंधित गुण : शनीचा जन्म सूर्याच्या लयकारी शक्तीपासून झाल्यामुळे त्याच्यामध्ये तमोगुण प्रबळ आहे.

शनिदेवाशी संबंधित रस : शनीला तुरट चव किंवा रस प्रिय आहे.

शनिदेवाचे प्रिय पुष्प : शनीला शनितत्त्व आकृष्ट करणारी गडद निळ्या रंगाची पुष्पे प्रिय आहेत.

शनिदेवाशी संबंधित धातू : शनीचा संबंध ‘लोह’, या धातूशी आहे. शनीला प्रसन्न करण्यासाठी काही ठिकाणी शनीच्या लोहप्रतिमांची स्थापना केली जाते आणि शनीला लोह अर्पण केले जाते.

शनिदेवाशी संबंधित काळ : शनीची शक्ती रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात कार्यरत असते.

शनिदेवाशी संबंधित कालांश : शनीचा कार्यकाळ वर्षाशी संबंधित आहे.

संबंधित तिथी आणि वार : शनिदेवाला त्रयोदशी ही तिथी प्रिय आहे. सप्ताहातील शनिवार हा शनीशी संबंधित दिवस आहे.

शनिदेवाशी संबंधित अन्य देव

अधिपती : महादेव हा शनीचा अधिपती आहे. त्यामुळे शनीचा प्रकोप शांत करण्यासाठी शिवाची किंवा शिवाचा अवतार असलेल्या हनुमानाची उपासना करतात.

शनिदेवाशी संबंधित वास्तूमंडलातील विविध देव

शनीची अधिदेवता (डाव्या बाजूची देवता) – यम : यम ‘कर्मप्रधान देवता’ म्हणून कार्यरत असतांना तो पापी लोकांना दंडित करण्यासाठी शनीला प्रेरणा देतो.

शनीची प्रत्यधिदेवता (उजव्या बाजूची देवता) – प्रजापति : शनीची उग्रता न्यून करून त्याला शांत करण्यासाठी प्रजापतीची तारक शक्ती कार्यरत असते.

शनिदेवाशी संबंधित शस्त्रे : धनुष्य-बाण आणि शूल (भाला), ही शस्त्रे शनीशी संबंधित आहेत. ‘धनुष्याकृती’ हे शनीने वक्रमार्गाने चालणार्‍यांवर लक्ष ठेवून शरसंधान केल्याचे द्योतक आहे. पूजनाच्या ठिकाणी चौरंगावर नवग्रह देवतांची स्थापना करतांना काळ्या रंगाच्या अक्षतांनी शनिमंडलाचे प्रतीक असणारी धनुष्याकृती चौरंगाच्या पश्चिम दिशेला सिद्ध केली जाते.

शनिदेवाचा मनुष्याचा देहाशी असणारा संबंध : शनीचा संबंध मनुष्याच्या देहातील स्नायूंशी आहे.

शनिदेवामुळे मिळणारे शुभ-अशुभ फळ : शनीचा कोप झाला, तर मनुष्याला अशुभ फळाची प्राप्ती होते; परंतु शनीची मनुष्यावर कृपा झाली, तर त्याला पुत्रवान आणि धनवान होण्याचे भाग्य लाभते.

शनिदेवाशी संबंधित हविर्द्रव्य : नवग्रह यज्ञामध्ये शनीला दूर्वा किंवा शमी यांची आहुती दिली जाते. दूर्वा किंवा शमी यांमध्ये कार्यरत असणार्‍या गणेशतत्त्वाची शक्ती शनीला सृजनशील कार्य करण्यासाठी प्रेरक असते. शनिदेवाला दूर्वा किंवा शमी यांची आहुती दिल्यामुळे उपासकाचे पापक्षालन होऊन त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते.


शनैश्चर जयंतीचे धार्मिक महत्त्व
अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना ग्रह-नक्षत्रांच्या सूक्ष्म शक्ती अधिक प्रभावी मानल्या जातात. धार्मिक श्रद्धेनुसार अमावास्येच्या दिवशी निर्गुण स्वरूपातील ऊर्जा कार्यरत असते. शनैश्चर जयंतीच्या दिवशी शनिदेवाचे तत्त्व सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पटींनी सक्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी शनी मंत्रजप, तैलाभिषेक, शमी पूजन आणि दानधर्म करण्यास विशेष महत्त्व दिले जाते.


शनिदेवाचा परिवार
धार्मिक कथांनुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. सूर्यदेव आणि संध्या यांच्यापासून जन्मलेले यमदेव आणि यमुना ही शनिदेवाची सावत्र भावंडे मानली जातात. तसेच तापी ही त्यांची सख्खी बहीण असल्याचे सांगितले जाते.
शनिदेवाच्या पत्नींची नावे धामिनी आणि नीला अशी आहेत. धार्मिक मान्यतेनुसार धामिनी उग्र शक्तीचे प्रतीक मानली जाते, तर नीला सौम्य आणि शांत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते. कुलिंगा नावाचा पुत्र आणि गुल्लिका नावाची कन्या अशी त्यांची अपत्ये असल्याचे पुराणांमध्ये वर्णन आढळते.


कर्मप्रधान देव म्हणून शनिदेव
हिंदू धर्मात प्रत्येक देवतेचे स्वतंत्र कार्य मानले गेले आहे. भगवान शिव ज्ञानाचे प्रतीक, भगवान विष्णू मोक्षदाते, श्री गणेश बुद्धीचे अधिष्ठाता, तर देवी सरस्वती विद्या आणि कला यांचे प्रतीक मानल्या जातात. त्याचप्रमाणे शनिदेव हे मनुष्याला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देणारे देव मानले जातात. त्यामुळे त्यांना ‘कर्मप्रधान देव’ असे संबोधले जाते.


न्यायप्रिय देवतेची ओळख
शनिदेवाला न्यायाचे देव मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे कार्य शनिदेव करतात. चांगल्या कर्मासाठी सुख, तर चुकीच्या कर्मासाठी कठोर परिणाम मिळतात, अशी धारणा आहे. मात्र ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा होते, त्यांना आर्थिक स्थैर्य, प्रगती आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते, असे मानले जाते.


शनिदेवाशी संबंधित रत्न आणि प्रतीक
शनिदेवाशी संबंधित प्रमुख रत्न म्हणून ‘नीलम’ ओळखले जाते. ज्योतिषशास्त्रात नीलम रत्न शनी ग्रहाशी संबंधित मानले जाते. तसेच ‘प’ वर्गातील अक्षरांचा संबंध शनिदेवाशी जोडला जातो. धार्मिक मतानुसार या शक्तीमुळे दुष्कर्मांची गती मंदावण्यास मदत होते.


शमी आणि दूर्वेचे विशेष महत्त्व
नवग्रह पूजेमध्ये शनिदेवाला शमीची पाने किंवा दूर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार शमी आणि दूर्वेमध्ये सकारात्मक ऊर्जा कार्यरत असते. शनिदेवाला शमी अर्पण केल्यास नकारात्मकता कमी होऊन आरोग्य, मानसिक शांतता आणि पापक्षालनाचा लाभ मिळतो, असे मानले जाते.


उपासनेसाठी विशेष दिवस
शनैश्चर जयंती आणि शनि अमावास्या एकत्र आल्यामुळे यंदाचा दिवस शनी उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक भाविक या दिवशी शनी मंदिरात दर्शन, तेल अर्पण, दानधर्म आणि मंत्रजप करून शनिदेवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात.


धार्मिक श्रद्धा, ज्योतिष आणि आध्यात्मिक परंपरेच्या दृष्टीने ‘शनैश्चर जयंती २०२६’ हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरत असून देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.