white airplane
Photo by Carlos Pernalete Tua on Pexels.com

नाशिक – ओझर विमानतळावरून एअर कार्गो सेवेला प्रारंभ झाला आहे. मंगळवार दिनांक २१ रोजी नाशिकची १०० किलो गुलाबाची फुले नवी दिल्ली येथे रवाना करण्यात आली. या सेवेचा जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. ओझर विमानतळावर सध्या इंडिकोच्या वतीने नवी दिल्ली, नागपूर, अहमदाबाद हैदराबाद, इंदूर व गोवा अशा सहा शहरांसाठी प्रवासी सेवा दिली जात आहे. 

विशेष कार्गो विमानांचेही उड्डाण येथून होते. दरमहा चार ते पाच विमाने मध्यपूर्व आशियात कृषीमाल शेळ्या मेंढ्या घेऊन जातात. त्यामुळेच गेल्या वर्षी शारजा विमानतळ प्राधिकरणाने नवीन एअर कार्गो डेस्टिनेशन म्हणून नाशिकचा समावेश केला होता. मात्र सामान्यांसाठी खुली व नियमित कार्गो सेवेची उणीव भासत होती. यापूर्वी जेट एअरवेज व गेल्या वर्षी पर्यंत स्पाइट जेटच्या वतीने तीन ते पाच टन वजनाच्या मालासाठी कार्गो सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र ओझर येथून स्पाईडची सेवा बंद पडल्यानंतर या सेवेतही खंड पडला होता.

आता नाशिककरांना दररोज नवी दिल्लीला पाच टन वजनापर्यंतचा माल पाठवता येणार आहे. आणि कार्गो सेवेचा नाशिकमधील निर्यातदारांना मोठा फायदा होणार आहे. निर्यातीसाठीचे नमुने सुलभपणे पाठविता येणार आहेत. नाशवंत मालासाठीदेखील ही सेवा उपयुक्त ठरेल. औषधे, कृषी प्रक्रिया व अन्य उद्योगांना चालना मिळणार आहे.