सूर्य ऊर्जा देतो आणि घेतो. यांमुळे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी जी स्थिती आवश्यक आणि पोषक असते, ती आपोआप निर्माण होते. त्यामुळे पृथ्वीला शांत स्थिती प्राप्त होते. अग्निहोत्र हे जनित्र (जनरेटर) आहे आणि त्यातील अग्नीझोत यंत्र (टर्बाईन) आहे. गाईच्या शेणी, गाईचे तूप आणि अक्षत तांदूळ या घटकांचा अग्नीच्या माध्यमातून परस्पर संयोग होऊन असे अपूर्व सिद्ध (तयार) होते की, ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर धडकते, त्यांभोवती पसरते, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रीय करते आणि त्यामुळे पोषक वातावरण बनते. तद्नंतर त्या वातावरणातील सेंद्रिय द्रव्ये जगणे, वाढ होणे आणि विस्तार यांसाठी पोषण करणाऱ्या शक्तींचा पुरवठा केला जातो. अशा रीतीने अग्निहोत्र प्रक्रिया वायूमंडलाची हानी प्रत्यक्षपणे भरून काढते.

1331532497_agnihotra320

१. हवनपात्र

अग्निहोत्र करण्यासाठी विशिष्ट आकाराचे ताम्र पिरॅमिड पात्र आवश्यक आहे. ताम्र धातूमधे वहन गुण आहेत. ‘तांबे’ या धातूमध्ये देवतांची सूक्ष्मतर स्पंदने आकृष्ट करण्याची क्षमता अन्य धातूंच्या तुलनेमध्ये अधिक असते. या धातूमध्ये देवतांच्या सूक्ष्मतर स्पंदनांचे रूपांतर सूक्ष्म स्पंदनांमध्ये होते. त्यामुळे ही स्पंदने सामान्य व्यक्तीला सहज ग्रहण करणे शक्य होते.

तांब्याच्या पात्रात केलेल्या हवनातून तेजाचे ऊत्सारण अल्प कालावधीत संपूर्णतः होऊ शकते; म्हणून हवनासाठी तांब्याचे पात्र वापरतात. हे पात्राच्या आतून न्यूनतम स्तरावर १४.६ सें.मी. x १४.६ सें.मी या आकारात आणि ५.८ सें.मी. x ५.८ सें.मी. खोलीच्या रूपात बनवतात. याची उंचीही ७ सें.मी. एवढी घेतली जाते. यामध्ये प्रत्येक २ सें.मी. नंतर एक अशा दोन खाचा बनवल्या जातात. या खाचांतून त्या त्या स्तरावर, म्हणजेच अधस् आणि मध्य स्तरावरील तेजतत्त्वात्मक ऊर्जा घनीभूत होऊन ती आवश्यकतेप्रमाणे पात्रातून हवन संपल्यानंतरही पोकळीच्या माध्यमातून कार्य करू शकते. ऊध्र्व वायूमंडलातील तेजतत्त्वात्मक ऊर्जा ही थेट आकाशमंडलातच घनीभूत होत असल्याकारणाने या शक्तीला घनीभूत करण्यासाठी खाच करण्याची आवश्यकता नसते. उतरत्या पद्धतीने केलेल्या पात्रातील खोलीतील पोकळीत हवनातील त्या त्या स्तरावरील वायूरूप अग्नी घनीभूत होण्यास साहाय्यक होऊन या अग्नीच्या स्पर्शाने भूमीलगतचे वायूमंडल शुद्ध होण्यास साहाय्यक होते. सकाळच्या अग्निहोत्र समयी सर्व प्रकारच्या ऊर्जा, उदा. विद्युत, तसेच इथर द्रव्य इत्यादी पिरॅमिड आकाराच्या पात्राकडे आकर्षिल्या जातात. सूर्यास्तसमयी या ऊर्जा पिरॅमिड आकाराच्या पात्रातून पुनश्च वेगाने बाहेर फेकल्या जातात.

२. हवनद्रव्ये

अग्निहोत्रात वापरली जाणारी माध्यमे सात्विकतेचा पुरस्कार करणारी असून ती नैसर्गिकतेवर आधारित आहेत. हवन करतांना गायीच्या गोवऱ्या , गायीचे तूप आणि अखंड तांदूळ वापरले जातात. हे घटक त्या त्या तत्त्वाच्या स्तरावर अग्नीच्या संयोगाने सूक्ष्म वायूची निर्मिती करतात.

हवनद्रव्यांचे महत्त्व

१. तूप आणि शेणाच्या गोवऱ्या अग्नीतून उत्पन्न होणाऱ्या सात्विक ऊर्जेला जडत्व प्राप्त करून देऊन त्यांना भूमीमंडलाकडे आकृष्ट करून घेऊन त्यांचे भूमीमंडलात गालिचासारखे आच्छादनात्मक पांघरुण अंथरण्यात अग्रेसर आहेत.

२. तांदूळरूपी आहुतीसदृश सात्विक घटक हा अग्नीतून उत्पन्न होणाऱ्या सात्विक ऊर्जेतील तेजाला धुराच्या रूपात मध्यमंडलात घनीभूत करून देणारा आहे.

अ. गोवंशाच्या गोवऱ्या

गाय वा बैल यांच्यापासून मिळणारे शेण घ्यावे. त्याच्या चपट्या आकाराच्या पातळ गोवऱ्या थापाव्यात आणि सूर्यप्रकाशात वाळवाव्यात. जेव्हा सूर्याच्या उन्हामध्ये वाळवले जाते, तेव्हा सूर्यरूपी तेजतत्त्वातून चैतन्याचा प्रवाह शेणात आकृष्ट होतो. गोवऱ्यांमध्ये ईश्वराकडून चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होतो. गोवऱ्यांच्या प्रज्वलनातून वातावरणात वायूस्वरूपात चैतन्याच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होते आणि वातावरणाची शुद्धी होते.

आ. तांदूळ (अक्षता)

अखंड आणि पॉलिश न केलेल्या तांदुळांमध्ये ईश्वराकडून आकृष्ट झालेली मूळ तत्त्वे टिकून रहातात. तांदुळांना पॉलिश केल्यामुळे त्यांतील मूळ ईश्वरी तत्त्वे लोप पावतात आणि त्यांना कृत्रिमता प्राप्त होते. तांदुळाचा दाणा भंग पावल्यास त्यातील सूक्ष्म ऊर्जांची अंतर्रचना विस्कळीत होते; म्हणून तो चैतन्यप्रदायी अग्निहोत्रासाठी अपात्र ठरतो. यासाठी अक्षता, म्हणजे तांदुळाचे अखंड दाणेच वापरावेत.

इ. गायीचे तूप

गायीच्या दुधापासून सिद्ध (तयार) केलेले लोणी मंद अग्नीवर तापवावे. पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचा पदार्थ दिसू लागल्यावर गाळणीतून गाळून घ्यावे. ते द्रव्य म्हणजेच तूप. अग्निहोत्राच्या अग्नीत हव्य पदार्थ म्हणून हे उपयोगात आणला असता ते ‘वहन प्रतिनिधी’, या नात्याने सूक्ष्म ऊर्जांना वाहून नेण्याचे कार्य करते. गायीच्या तुपात शक्तीशाली ऊर्जा अवगुंठित झालेली असते.

३. अग्निहोत्राची कृती

अ. अग्निहोत्रासाठी अग्नी प्रज्वलित करणे

हवनपात्राच्या तळाशी गोवरीचा लहान आकाराचा एक चपटा तुकडा ठेवावा. त्याच्यावर गोवरीचे तुकडे तूप लावून अशा रीतीने ठेवावेत (गोवरीच्या उभ्या व आडव्या तुकड्यांचे २-३ थर) की, त्याद्वारे आतील पोकळीत हवा खेळती राहील. नंतर गोवरीच्या एका तुकड्याला गायीचे तूप लावून पेटवावा आणि तो तुकडा हवनपात्रामध्ये ठेवावा. थोड्या वेळात गोवऱ्यांचे सर्व तुकडे पेट घेतील. अग्नी प्रज्वलित होण्यासाठी हवा घालण्यासाठी हातपंख्याचा उपयोग करावा. अग्नी पेटवण्यासाठी रॉकेलसारख्या ज्वलनशील पदार्थांचा उपयोग करू नये. अग्नी निर्धूम प्रज्वलित असावा, म्हणजे त्याचा धूर निघू नये.

आ. अग्निहोत्र मंत्र

या अग्नीच्या प्रज्वलिततेला मंत्ररूपी तेजाचे अनुष्ठान लाभल्याने अग्नीतून उत्पन्न होणाऱ्या तेजोलहरी थेट आकाशमंडलातील देवतांशी संधान साधून त्या त्या देवतांच्या तत्त्वांना जागृत करून वायूमंडलाची शुद्धी करून देणाऱ्या आहेत. मंत्रांच्या उच्चारांपासून उत्पन्न होणारी कंपने वातावरणात आणि त्यातील सजीव आणि वनस्पती यांवरही परिणाम करतात. अग्निहोत्राचे मंत्र त्यांच्या मूळ रूपात जसेच्या तसे कोणताही भेद न करता उच्चारले जावेत. मंत्रांचे उच्चार अग्निहोत्र-स्थानात गुंजतील अशा नादमय रीतीने, फार गडबडीने किंवा फार सावकाश न करता स्पष्ट आणि खणखणीत स्वरात करावे.

सूर्योदयाच्या वेळी म्हणावयाचे मंत्र

सूर्याय स्वाहा सूर्याय इदम् न मम
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम् न मम

 सूर्यास्ताच्या वेळी म्हणावयाचे मंत्र

अग्नये स्वाहा अग्नये इदम् न मम
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम् न मम

हवनद्रव्ये अग्नीत सोडणे

तांदळाचे दोन चिमूटभर दाणे तळहातावर अथवा तांब्याच्या ताटलीमधे घ्यावेत आणि त्यावर गायीच्या तुपाचे काही थेंब टाकावेत. अचूक सूर्योदयाच्या (किंवा सूर्यास्ताच्या) वेळी पहिला मंत्र म्हणावा आणि ‘स्वाहा’ शब्द म्हटल्यावर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा यांच्या चिमटीत वरील तांदूळ-तूप मिश्रण घेऊन ते अग्नीत सोडावे. (बोटाच्या चिमटीत मावतील एवढे तांदूळ पुरेसे आहेत.) दुसरा मंत्र म्हणावा आणि ‘स्वाहा’ शब्द म्हटल्यावर उजव्या हाताने वरील तांदूळ-तूप मिश्रण अग्नीत सोडावे. मध्यमा आणि अनामिका यांना अंगठा जोडून, म्हणजेच आकाशरूपी निर्गुणाच्या बळावर अनुक्रमे तेज आणि आप या प्रवाहित लहरींच्या साहाय्याने हवनीय द्रव्याची पात्रात आहुती द्यावी. तेजतत्त्वाच्या लहरींमुळे देवता जागृत होतात आणि आपतत्त्वाच्या साहाय्याने देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी भूमीमंडलाकडे प्रवाहित होतात; म्हणून देवतांना आवाहन करतांना मध्यमा आणि अनामिका यांना आकाशतत्त्वरूपी अंगठ्याची जोड दिली जाते. हवन करतांना मध्यमा आणि अनामिका यांना अंगठा जोडून केलेली मुद्रा असावी. (अंगठा आकाशाच्या दिशेने ठेवणे).

ई. वेळेचे महत्त्व

संधीकाळाला प्राचीन शास्त्रात ‘तीर्थ’ असे रूपकात्मक अर्थाने उल्लेखले आहे. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी (संधीकाली) आपण अग्नी प्रज्वलित करून, हातात आहुती घेऊन मनोमन परमात्म्याचे आवाहन आणि चिंतन करतो, त्या वेळी अग्नी ईश्वरी शक्तीला तेथे आणून प्रत्यक्ष उपस्थित करत असतो. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि संरक्षककवचही बनते. अयोग्य वेळी अग्निहोत्र केल्यास त्यातील चैतन्य अप्रकट स्वरूपातच रहाते. म्हणजे त्यातून प्रक्षेपणकार्य होत नाही. त्यामुळे अग्निहोत्र करणाऱ्या व्यक्तीला त्याचा लाभ होत नाहीच, तसेच वातावरणावरही त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

उ. प्रजापतीलाच प्रार्थना करून सुरुवात आणि
त्याच्याच चरणी कृतज्ञता व्यक्त करून हवनाचा शेवट करावा.

ऊ. अग्निहोत्र करणारा

घरातील एका स्थानी अग्निहोत्र करत असतांना कुटुंबातील कोणाही एकाच व्यक्तीने आहुती द्याव्यात. सोयर-सुतक असेल, तर दुसऱ्याने आहुती द्याव्यात. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींना स्वतंत्रपणे अग्निहोत्र करण्याची इच्छा असेल, तर ते आपापली स्वतंत्र पात्रे घेऊन अग्निहोत्र करू शकतात. आपल्या घराजवळील बागेत वा शेतातही अग्निहोत्र करता येते.

४. अग्निहोत्राचा परिणाम

अ. हवनद्रव्ये

• गायीच्या गोवऱ्या : गोवऱ्याच्या हवनातून निर्माण होणारे तेज जडत्वदायी असल्याने ते भूमीमंडलात प्रकट तेजाच्या रूपात स्थिर होते.

• तांदूळ : तांदळाच्या माध्यमातून आपाच्या स्तरावर मध्य मंडलात प्रवाही स्वरूपात तेजाचे वायूमंडल सिद्ध (तयार) होते. हेच ते दिव्य प्रकाशमान भासणारे तेज.

• तूप : तुपाच्या आहुतीतून ही तेजरूपी दिव्यता आकाशाच्या स्तरावर अल्प कालावधीत संयोग पावून त्यातून सूक्ष्मतम स्तरावर अप्रकट, म्हणजेच शीतलता प्रदान करणारे व चैतन्याशी संबंधित तेज निर्माण करते. हेच तेजरूपी चैतन्य अणूयुद्धातील प्रदूषणापासून जिवांचे दीर्घकाळ रक्षण करू शकते.

परिणाम टिकण्याचा अवधी

• कर्मकांड म्हणून हवन : दिवसातून दोनदा हवन केले असता, त्यामधील अवधीत १२-१२ तासांच्या पुरते रक्षण होऊ शकते. एक कर्मकांड म्हणून हे हवन केले असता, अशी तासांच्या भाषेत संरक्षणात्मक प्रक्रिया पार पडते.

• परत परत हवन : अनेक दिवस हवन केल्यास अभेद्य असे संरक्षककवच बनू शकते.

• भावपूर्ण हवनाने चौपट लाभ होणे : भावपूर्ण हवन केल्यास याचा कालावधी वाढून तो काही महिन्यांच्या भाषेत कार्य करू शकतो, म्हणजेच दिवसातील दोन हवन चार दिवसांच्या भाषेत, म्हणजेच महिनाभर हवन केल्यास चार महिन्यांचे संरक्षण पुरवू शकतात.

• पूर्ण शरणागतीने केलेल्या हवनाने आठपटीने लाभ होणे : पूर्ण शरणागतीने हवन केल्यास हा कालावधी वर्षांच्या भाषेत वाढू शकतो, म्हणजेच दोन हवन आठ दिवसांचे संरक्षण पुरवू शकतात, म्हणजेच एक महिनाभर हवन केल्यास जवळजवळ आठ महिने संरक्षण होऊ शकते. अशा प्रकारे हवन प्रक्रियेत सातत्य ठेवले, तर कृपेच्या स्तरावर शरणागतीमुळे सिद्ध झालेले हे कवच जवळजवळ पुढे चार महिने, म्हणजेच अधिकतम स्तरावर वर्षभर रक्षण करू शकते.

५. अग्निहोत्रानंतर करावयाच्या कृती

अ. ध्यान

प्रत्येक अग्निहोत्रानंतर शक्य तेवढी अधिक मिनिटे ध्यानासाठी राखून ठेवावीत. निदान अग्नी शांत होईपर्यंत तरी बसावे.

आ. विभूती (भस्म) काढून ठेवणे

पुढील अग्निहोत्राच्या थोडे अगोदर हवनपात्रातील विभूती (भस्म) काढून ती काचेच्या अथवा मातीच्या भांड्यात साठवून ठेवावे. तिचा वनस्पतीसाठी खत म्हणून आणि औषधे बनवण्यासाठी उपयोग करता येतो. अग्निहोत्रातील किंवा यज्ञातील विभूती वायूमंडलात फुंकण्यास आणि अंगावर लेपन करण्यासाठी वापरू शकतो. वास्तूशुद्धीसाठी विभूती फुंकणे, देहावरील आवरण नष्ट करण्यासाठी ती त्वचेला लावणे, विभूतीचे तीर्थ पोटात घेऊन आंतरिक शुद्धी साधली जाणे, असेही उपयोग करता येतात. विभूतीचा वास घेऊन देहाची सूक्ष्म स्तरावर शुद्धी होऊन मनालाही प्रसन्नता प्राप्त होऊन अनावश्यक विचार आणि विकल्प दूर होऊन तेजदायी सात्विक विचारलहरींचे देहात संवर्धन होते. एका अग्निहोत्राची विभूती दोन दिवसांपर्यंतच वापरावी, अन्यथा ती एखाद्या सात्विक स्थानी ठेवावी, तरच तिच्यातील चैतन्य टिकून राहू शकते.

घराघरात अग्निहोत्र, यज्ञयाग आणि होम-हवनादी कर्म करणे आवश्यक

घराघरात चालणारे अग्निहोत्र, ब्रह्मयज्ञकर्म, यज्ञयागादी, तसेच तत्सम् होम-हवनादी कर्म समष्टी साधना म्हणून केल्यास वायूमंडलात त्या त्या वेळी तेजाच्या स्तरावर मंत्रांच्या साहाय्याने झालेले घनीकरण आवश्यक त्या वेळी ढाल बनून या अणूबॉम्बरूपी कारवायांतून प्रक्षेपित होणाऱ्या महाभयानक अशा सूक्ष्म किरणोत्सर्गाला तोंड देऊन त्यांच्याशी लढून त्यांना नष्ट करू शकेल; कारण यज्ञयागातून निर्माण होणारी ऊर्जा ही सूक्ष्मतर स्तरावर कार्य करणारी असल्याने ती सूक्ष्म रूपात कार्यरत असलेल्या रज-तमात्मक अशा किरणोत्सर्गरूपी किरणांना नष्ट करून मानवजातीचे रक्षण करेल.

संदर्भ व अधिक माहिती : सनातन – निर्मित ग्रंथ ‘अग्निहोत्र – अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासूनच्या रक्षणाचाही मार्ग !