स्री…. काल आज आणि उद्या. (International Women’s Day)

72

तू अबला तू ललना
न तू सैरंध्री …
तू दुर्गा तू चंडी उठ पुरंध्री…

मनुष्य प्राण्याला माणूस बनविणारी आणि जिच्यामुळे कुटुंब व्यवस्था जन्माला आली ती स्त्री… त्या कुटुंबाचा मजबूत पाया बनते. तिच्या त्यागावर, तिच्या संस्कारावर आणि तिच्या जिद्दीवर कुटुंबरूपी इमारत उभी राहते. आणि याच कुटुंबातून पुढे कधी कल्पना चावला जन्म घेऊन आकाशी जिद्दीने विहंगते.. तर कधी अग्नीवीर बनण्याचे स्वप्न उराशी पाहू लागते .

मला आठवतं..साधारण चार पिढींचा प्रवास. माझी आजी पायात भक्कम दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालत असत. त्याकाळी रूढी परंपरेने तिला त्या पैंजणात इतकं जखडून ठेवलेलं की त्यातून ती कधी बाहेर आलीच नाही. तिने स्वतःचे विश्व स्वयंपाक घरापुरतच मर्यादित ठेवलं.. नंतर आई भले थोडी वेगळी ठरली तिने पैंजण ऐवजी तोरड्या पसंत केल्यात वजन कमी केलं.. पैंजण प्रमाणे बंधनांचे.. परंतु बंधनं झुगारणं तिलाही शक्य झालं नाही. ती स्वयंपाक घरातून बाहेर पडली पण घराचा उंबरठा ओलांडण्याचं धाडस करता करता ती पुन्हा एकदा सामाजिक बंधनात बंदिस्त झाली.

तिच्या पुढच्या पिढीतली मी.. पैंजणांचं.. तोरड्यांचं वजन नको म्हणून पायात पट्टीचे पैंजण घालायला लागली. बाहेर पडली स्वतःच्या बळावर पण सारं विश्व पादाक्रांत करता करता स्रीत्वाला नवा आयाम दिला. पुढच्या पिढीचे काय सांगू कदाचित माझ्या मुलीच्या पायात पैंजण नसतीलही.. परंतु संपूर्ण जगाला मुठीत घेतल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हा तिच्यातला दुर्दम्य आत्मविश्वास मला स्रीमधील बदलाची वारंवार जाणीव करून देतो.

साधारणतः गेल्या दोन शतकात महिलांच्या स्थितीत कमालीचा बदल झालेला पाहावयास मिळाला. स्री विचारी झाली तिने आपल्या राहणीमानात,पोशाखात आणि महत्त्वाचं म्हणजे विचारात बदल करून घेतला. सडा सरपण,चूल मूल, रूढी परंपरा, सोशिकता हे सर्व पद्धतशीरपणे बाजूला सारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सर्व नव्या क्षेत्रात स्वतःला स्वयं सिद्ध केले.

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावण्याचे सामर्थ्य आज तिच्यात अवतरले. जर पुरुष शिव असेल तर स्री शक्ती आहे, जर पुरुष अस्तित्व असेल तर स्री पूजनीय आहे जर पुरुष पौरुषमय असेल तर स्री लक्ष्मी आहे. तेव्हा जोवर स्री समाज उद्धारासाठी पुढे येत नाही तोवर समाजाची प्रगती अशक्य आहे. कवयित्री बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे…

अरे संसार संसार | नाही रडणं कुडण |
येड्या गळ्यातला हार | म्हणू नको रे लोडणं ||

आजही प्रगतीपथी असलेली स्री संसार कसाही असला तरी त्याला गळ्यातला हार मानून स्वीकारते, कुटुंबाची घडी बसवते तरी असता स्त्रीभ्रूणहत्या सारखी निंदनीय घटना कुठे ना कुठे ऐकायला येतात.त्यापुढे जाऊन मला अनेकदा चिंता वाटते ती माझ्या ग्रामीण भागात राहणाऱ्या भगिनींची शहरात सुधारण्याची थोडीफार चुणूक पहावयास मिळते ,परंतु ग्रामीण आदिवासी भगिनींच्या डोई आणि कटी पाण्याचा हंडा पाहिला की तिचे अपार कष्ट प्रवृत्तीची कीव येते आणि वाईट वाटते. अरे सिमेंटच्या घरात राहणाऱ्या आम्ही घरात सुध्दा चप्पल घालतो पण रानोवनी काट्यापेट्यात हिंडणारी ही बहिणी कधी आमच्या प्रवाहात येईल हा विचार मनाला विचारला की मन निरूत्तर होतं.

कधी ती पाठोपाठ अपत्य जन्माला घालता-करता स्वतः संपते.कधी कुपोषणाची बळी होते कधी व्यसनाधीन नवऱ्याची मार खाणारी गरीब गाय होते तर कधी अंधश्रद्धेच्या जोखडांनी दासी बनते .

तसं पाहता अंधश्रद्धेवर मात करणाऱ्या आऊसाहेब जिजाऊंचा इतिहास आम्हासाठी प्रेरणादायी आहे. धाडसी, साहसी, स्वाभिमानी,मुत्सुद्दी, महत्त्वाकांक्षी,बुद्धिमानी,न्यायी, अध्यात्मिक अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या,संकटाला न घाबरणाऱ्या,अत्यंत निग्रही अशा आऊसाहेबांनी दोन दोन छत्रपती घडवून स्वराज्याची स्थापना केली हे आम्हासाठी प्रेरणादायी आहे.

आज जागतिक महिला दिन (International Women’s Day) या निमित्ताने मला एकच सांगावसं वाटतं ते म्हणजे आम्हा स्त्रियांसारख्या इतर दारिद्र्यात खितपत पडलेल्या महिला भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.त्यासाठी शहरात बसून केलेले नियोजन कधीही यशस्वी होणार नाही गरज आहे ती खेड्यात जाऊन ग्रामीण भागात जाऊन त्यांना आपल्या सोबत घेण्याची,त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्याची त्यांच्यात आत्मविश्वासाचं बळ भरण्याची आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची. चला एकदा एकत्रित प्रयत्न निश्चितपणे करूया.

सौ. सविता पाटील ठाकरे, मा.शिक्षिका
प्रदेशाध्यक्ष,
जिजाऊ ब्रिगेड,
दादरा नगर हवेली.
+91 9624312560