मुंबई, दि. 30 :
‘तळागाळापर्यंत पोहचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व अकाली गमावले आहे, अशा शोकपूर्ण भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, पूर्वीचा एक सच्चा शिवसैनिक ते आमदार आणि खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची वाटचाल जवळून पाहिली आहे. मतदार संघातील विकास कामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण असा पाठपुरावा आणि धडपड असायची. नुकतेच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यानंतर त्यांचे असे अकाली निधन त्यांच्या कुटुंबीयांसह, कार्यकत्यांकरिता एक आघात आहे. धानोरकर कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
“खासदार बाळू धानोरकरांच्या निधनाने महाराष्ट्राने एक तरूण राजकारणी गमावला आहे. त्यांच्या निधनाने लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या कार्याने एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. एक तरूण राजकारणी दिल्लीच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करीत असतानाच त्यांचे अकाली निधन दुःखदायक आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.