पणजी – गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून नद्या, ओहोळ दुथडी भरून वहात आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळणे,भिंत कोसळणे, छोटे पूल वाहून जाणे, रस्ता वाहून जाणे, अशा घटना घडल्या आहेत. यामुळे गोवा राज्यातील आणि महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोव्यात काणकोण परिसरात पूरजन्य स्थिती आहे. ७ जुलै या दिवशी अवघ्या ५ घंट्यांमध्ये गोव्यात सरासरी ४ इंचांहून अधिक पाऊस कोसळला.
हंगामी पावसाने इंचाचे अर्धशतक (५० इंचांहून अधिक पाऊस) पार केले आहे. गोव्यातील धबधब्यांवर सहलीला जाण्यास वन विभागाने बंदी घातली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील भातशेती पाण्याखाली गेली आहे. छोट्या पुलांवरून पाणी वहात असल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे
हवामान खात्याने गोव्यात मुसळधार पावसाची चेतावणी दिल्यानुसार ६ जुलै या दिवशी रात्रीपासून राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुने गोवे येथे ७ घंट्यांमध्ये ६ इंचांहून अधिक पाऊस कोसळला. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे, तसेच दरडी कोसळणे, पडझड आणि छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. पेडणे, डिचोली, सांखळी, वाळपई, फोंडा, कुठ्ठाळी, सांगे आणि काणकोण या भागांत झाडे आणि घरे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. डिचोली आणि सत्तरी तालुक्यांमधील अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठाही ठप्प झालेला आहे. सत्तरी येथे पाली धबधब्यावर अडकलेल्या १५० नागरिकांची म्हादई अभयारण्यातील कर्मचारी, स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे सैनिक यांनी सुखरूप सुटका केली आहे. कुंडई औद्योगिक वसाहतीत भिंत कोसळून खोलीत रहाणारे ३ कामगार ठार झाले आहेत. कोन्सुआ, कुठ्ठाळी येथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यांमुळे ७० ते ८० मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.