रामनाथी (गोवा) – ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उत्साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्या वंदनीय उपस्थितीत २४ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात हिंदु जनजागृती समिती आयोजित वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.
धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वंदन करून आणि श्री गणेशाला प्रार्थना करून अधिवेशनाला प्रारंभ झाला. यानंतर महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, स्वामी निर्गुणानंद पुरी, महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, श्रीवासदास वनचारी, संत रामज्ञानीदास महात्यागी महाराज, रस आचार्य डॉ. धर्मयश, प.पू. संत संतोष देवजी महाराज, संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सनातनच्या वेदपाठशाळेचे पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. अमर जोशी यांनी वेदपठण केले.
हिंदू आक्रमक आणि विस्तारवादी नव्हते, हे खोटे आहे. दसर्याच्या दिवशी आपले पूर्वज केवळ गावाचे सीमोल्लंघन करत नव्हते, तर देशाच्या सीमेचेही उल्लंघन करत होते. मातृभूमीविषयी संकुचित भावना आपणाला विस्तारवादी होण्यापासून रोखत आहे. त्यासाठी हिंदूंना विस्तारवादी व्हावेच लागेल. हिंदू सतर्क नाहीत. ‘आजूबाजूला काय घडते ?’, याविषयी हिंदूंनी सतर्क असायला हवे. मुंग्यांकडून आपण हे शिकायला हवे. मुंग्या कुठल्याही अन्य प्राण्याला स्वत:च्या घरात घुसू देत नाहीत. कुणी त्यांच्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केला, तर त्या आक्रमण करतात आणि बिळाच्या बाहेरच त्याला नष्ट करतात. ही सजगता आणि आक्रमकता हिंदूंनी स्वत:मध्ये आणायला हवे. कुटुंब, भूमी, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी सजग असायला हवे. आपल्या धर्मावरही कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला, तर आपण आक्रमक असायल हवे, असे मार्गदर्शन मध्यप्रदेशातील इंदूर येथील श्री स्वामी अखंडानंद, गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी केले. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात ‘धर्मांतर रोखण्यासाठी आदिवासी क्षेत्रामध्ये केलेले कार्य’ या विषयावर बोलतांना केले.