गाझा – अखेर इस्रायलच्या तीव्र आक्रमणानंतर हमासने माघार घेत अमेरिकेचा युद्धबंदी प्रस्ताव स्वीकारला आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार १० इस्रायली नागरिकांची सुटका आणि ७० दिवसांचा युद्धविराम करण्यात येणार आहे. यासोबतच इस्रायलनेही काही पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करण्याची तयारी दर्शवली आहे.
सद्यस्थितीत इस्रायलकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी हा प्रस्ताव मान्य झाल्यास गाझामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत दिलासा मिळू शकतो.
यापूर्वी १९ जानेवारी २०२५ रोजी युद्धबंदी जाहीर झाली होती, परंतु १८ मार्च २०२५ रोजी इस्रायलने पॅलेस्टाईनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. त्यानंतर गाझामध्ये २ हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
या युद्धात आतापर्यंत ५५,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, ७ ऑक्टोबर २०२३ पासून हा संघर्ष सुरू आहे. इस्रायलने “हमास नष्ट होईपर्यंत कारवाई सुरूच राहील” असा इशारा दिला होता.
नवीन प्रस्तावामुळे या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात शांततेचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.