भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या दहाव्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भारताची अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचली असल्याचे सांगितले.
सध्या भारताच्या पुढे अमेरिका, चीन आणि जर्मनी या तीन देशांची अर्थव्यवस्था आहे. सुब्रह्मण्यम यांच्या म्हणण्यानुसार, जर देशाने सध्याच्या विकासगतीवर काम सुरू ठेवले, तर अडीच ते तीन वर्षांत भारत जर्मनीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो.
या ऐतिहासिक क्षणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत मंडपम्’ येथे झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आवाहन केले. त्यांनी राष्ट्रीय विकासासाठी सामूहिक आणि सामाजिक समृद्धीवर भर देण्याचे सांगितले.
जागतिक पातळीवर युद्धाचे वातावरण, मंदीचा प्रभाव, आणि अमेरिकेच्या आयात शुल्कासारख्या धोरणात्मक बदलांमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळत असताना, भारताची अर्थव्यवस्था मात्र भक्कमपणे पुढे जात आहे.
या पार्श्वभूमीवर जपानला मागे टाकणे ही केवळ एक आर्थिक कामगिरी नसून, भारताच्या जागतिक स्थानात झालेली लक्षणीय वाढ दर्शवणारी मोठी घटना आहे.
भारतीय नागरिकांना आजही देश पहिल्या क्रमांकावर जावा असे वाटते. मात्र त्याच वेळी महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्या दूर करून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, समाधानाने जगता येईल अशी व्यवस्था उभी राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.














