देशातील ऊर्जा सुरक्षेबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारताकडे सध्या ७६ ते ८० दिवसांसाठी पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून देशाच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक व्यवस्था सक्षम असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे.
या उपलब्ध साठ्यामध्ये धोरणात्मक पेट्रोलियम साठा, विविध रिफायनरींमधील साठा तसेच व्यावसायिक स्तरावरील इंधनसाठ्याचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीत होणाऱ्या चढउतारांचा तातडीचा परिणाम देशातील इंधन उपलब्धतेवर होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना भारताचा तेलपुरवठा सुरक्षित असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्या दीर्घकाळ उच्च स्तरावर राहतील असे वाटत नाही. मात्र, मध्यपूर्वेतील संघर्ष अपेक्षेपेक्षा जास्त काळ सुरू राहिला, तर जागतिक ऊर्जा बाजारासमोर नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्या आणि संबंधित यंत्रणा दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी विविध पर्यायांवर काम करत आहेत. देशाचे आयातीत तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी तेल विपणन कंपन्यांच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एलपीजी वगळता इंधन विक्रीमध्ये तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
त्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत डिझेलच्या विक्रीवर प्रति लिटर सुमारे ३० रुपयांचा तर पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर अंदाजे ६ रुपयांचा तोटा होत आहे. या नुकसानीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांवर दररोज सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपयांचा आर्थिक ताण पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, भूराजकीय घडामोडी आणि देशांतर्गत मागणी या घटकांचा आगामी काळात इंधन क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या घडीला देशातील इंधनसाठा पुरेसा असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.








