नवी दिल्ली – राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, आत्ता सर्वच पक्षांना आणि जनतेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यानुसार नेते मंडळींची तयारीही सुरू आहे. त्यातच केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्रासह इतर ३ राज्यांच्या विधानसभांबाबत महत्वाची अधिसुचना जाहीर केली आहे. विधानसभेची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे.
आज यासाठी मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने सर्व सामान्य नागरीकांना देखील आवाहन केले आहे. त्यांनी म्हंटले की ज्यांनी अद्यापपर्यंत मतदार नोंदणी केली नसेल त्यांनी तातडीने मतदार नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करा, अशा सुचना आयोगाने देखील दिल्या आहे.
२५ जूनपासून येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्रे, मतदारांचे समूह यांची माहिती घेतली जाणार आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना आता करण्यात आल्या आहे.