केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या सोन्याचे पितळेमध्ये रूपांतर झाल्याचा पुरोहितांचा आरोप !

6

केदारनाथ (उत्तराखंड) – गेल्या वर्षी एका अर्पणदात्याने केलेल्या दानातून केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहातील भिंती सोन्याने मढवल्या होत्या. आता मंदिराच्या पुरोहितांना दावा केला आहे की, सोन्याच्या या भिंतींचे रूपांतर पितळेच्या भिंतींत झाले आहे. चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे ज्येष्ठ पुरोहित आचार्य संतोष त्रिवेदी यांचा या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्यांनी यात १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचाही आरोप केला आहे. याला बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समिती, उत्तराखंड सरकार आणि प्रशासन उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुरोहित संतोष त्रिवेदी यांनी विचारले आहे की, मंदिर समितीने भिंती सोन्याने मढवण्यापूर्वी सोन्याची पडताळणी का केली नाही ? आम्ही सर्व पुरोहित या भिंती मढवण्याला सातत्याने विरोध करत होतो. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही, तर आम्ही सर्व पुरोहित याविरोधात तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

सौजन्य – आजतक

बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समितीने आरोप फेटाळले !
बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समितीचे कार्याधिकारी तिवारी यांनी पुरोहितांनी केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत. ते म्हणाले की, मंदिरांच्या भिंती रत्नजडीत सोन्याने मढवण्याचे कार्य एका अर्पणकर्त्याच्या साहाय्यातून करण्यात आलेले आहे. यासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोणतीही माहिती न घेता खोटी माहिती पसरवून लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशांवर कारवाई केली जाणार आहे, असे तिवारी यांनी व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे