पक्षावर राग नाही, मात्र खंत जरुर आहे- एकनाथ खडसे प्रतिक्रया

69

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना बोलत होते. खडसे ज्या पक्षात जातील, तिथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, असं ते म्हणाले.

खडसे यांचा राजीनामा आपल्याकडे आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथं सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत आपण  काही बोलणार नाही असं पाटील यांनी नमूद केलं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली. गेल्या 40 वर्षांत  भाजपा जिथं  पोहोचला नव्हता, तिथे तो आपण पोहोचवला, पक्षानं देखील आपल्याला बरंच काही दिलं. तसंच पक्षाच्या नेत्यांवर अथवा  पक्षावर आपला जराही राग नाही, असं  एकनाथ खडसे यांनी बातमीदारांना सांगितलं.

पक्ष सोडताना आपल्याला खंत असल्याचं ते यावेळी म्हणाले. येत्या शुक्रवारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पक्षाच्या कार्यालयात बातमीदारांशी बोलत होते. 

Source – newsonair.com