रामनवमी (Ramnavami)- इतिहास, महत्त्व, उत्सव साजरा करण्याची पद्धत

50

तिथी – रामनवमी (Ramnavami) हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम (Shriram) याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला. देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. – संकलक याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

श्रीरामाचा पाळणा –

श्रीरामाचा पाळणा – संदर्भ सनातन संस्था संकेतस्थळ

रामनवमी पूजाविधी –

प्रभु श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजे दु. १२ वाजता साजरा करतात. प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे. दुपारी १२ वाजता शंखनाद करून ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय ! असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा पाळणा लावावा. पाळणा झाल्यावर पूजनाला प्रारंभ करावा. नैवेद्याला सुंठवडा (सुंठीची आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. श्रीरामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार करावा. पूजनानंतर श्रीरामाची आरती करावी. संपूर्ण पूजाविधीसाठी क्लिक करा – श्रीराम नवमी पूजाविधी

श्रीरामाच्या काही नावांचा उगम

राम – हे नाव रामजन्माच्या आधीही प्रचलित होते. (रम्-रमयते) म्हणजे (आनंदात) रममाण होणे, यावरून राम हा शब्द बनला आहे. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍यांना आनंदात रममाण करणारा.

रामचंद्र – रामाचे मूळ नाव ‘राम’ एवढेच आहे. तो सूर्यवंशी आहे. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.

श्रीराम – दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला श्रीराम म्हणू लागले.

आपल्या नावाच्या आधी लावण्यात येणार्‍या ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम असतो; कारण ते ‘श्रीयुत्’चे संक्षिप्त रूप आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावांमध्ये ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम नाही. आपण श्रीयुत् असतो, म्हणजे ‘श्री’ युक्‍त असतो, म्हणजे आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट श्रीराम आणि श्रीकृष्ण हे साक्षात् भगवंतच होते.

‘पुष्कळ लोक एकमेकांना भेटतात, तेव्हा ते दोन वेळा ‘राम राम’ का म्हणतात ? दोन वेळा ‘राम राम’ म्हणण्याच्या मागे फार मोठे रहस्य आहे. ते आदी काळापासून चालत आले आहे. हिंदूंच्या बाराखडीत ‘र’ हे अक्षर सत्ताविसावे आहे, ‘आ’ची जागा दुसरी आहे आणि ‘म’ हे पंचविसावे अक्षर आहे. आता या तिन्ही अंकांची बेरीज केली, तर २७ + २ + २५ = ५४ होते. म्हणजेच राम या शब्दाची बेरीज ५४ होते. त्यामुळे दोन वेळा ‘राम राम’ म्हटल्याने १०८ वेळा म्हटल्यासारखे म्हणजे ‘राम राम’ म्हटल्याने संपूर्ण एक माळ नामजप होतो.’

सर्वार्थाने आदर्श

आदर्श पुत्र – रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने ‘दुःख करू नका’ असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला १४ वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो आणि पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.

आदर्श बंधू – अजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.

आदर्श पती – श्रीराम एकपत्‍नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्‍तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्‍नीची आवश्यकता असतांना दुसरी पत्‍नी न करता त्याने सीतेची प्रतिकृति आपल्याशेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्‍नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने बर्‍याच राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्‍वभूमीवर श्रीरामाचे एकपत्‍नीव्रत प्रकर्षाने जाणवते.

आदर्श मित्र – रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात साहाय्य केले.

आदर्श राजा – प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने ‘कौलिनभीतेन गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः ।’ (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.) असा मार्मिक श्‍लोक लिहिला आहे.

आदर्श शत्रू –

रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु : श्रीरामाशी अनुसंधान साधणारा भावबंध !

रामायण हा भारताचा अमूल्य ठेवा आणि इतिहास आहे. आधुनिकांनी कितीही नावे ठेवली आणि त्यांचे अस्तित्व अमान्य करण्याचा प्रयत्न केला, तरीही रामायण काळातील विविध घटनांची ही छायाचित्रे या इतिहासाची साक्ष देतात. रामायणाचा काळ हा त्रेतायुगातील म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यातून हिंदु संस्कृतीची महानता, प्राचीनता यांचाही प्रत्यय येतो. येथे रामायण काळातील श्रीलंकेतील स्थाने विशेष करून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा सीतामातेच्या अपहरणानंतर तेथील वास्तव्याचा पुरावाच आहे.

श्रीराम आणि श्रीलंका या दोन्हींचा संबंध लक्षात घेतल्यावर ‘रामसेतू’विषयी मनात विचार येतो. श्रीरामावतार त्रेतायुगात म्हणजे न्यूनतम १७ लक्ष वर्षांपूर्वी झाला. रामायणात वर्णिल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी श्रीरामाचे आगमन झाले, त्या त्या ठिकाणी नवीन तीर्थ, दिव्य क्षेत्र आणि मंदिर आज आपल्याला पहायला मिळते. १०० कोटी हिंदूंच्या भावना श्रीरामाच्या ज्या चिन्हाशी निगडित आहे, ते म्हणजे ‘रामसेतु !’

रामसेतूचे संशोधक श्री. कल्याणरामन् यांनी आम्हाला सांगितले, ‘‘रामसेतूचे आधीचे नाव ‘नलसेतु’ असे आहे. रामायणातही याला ‘नलसेतु’ याच नावाने संबोधिले आहे. रामेश्‍वरम् येथे समुद्र जेव्हा श्रीरामाला वाट देत नाही, तेव्हा श्रीराम क्रोधित होतो. वरुणदेव स्वयं प्रकट होतो आणि श्रीरामाला शांत करतो. वरुण म्हणतो, ‘हे श्रीरामा, तुझ्या वानरसेनेमध्ये विश्‍वकर्म्याचे नल आणि नील नावाचे वानर आहेत. ते तुला समुद्रावरून सेतु बांधायला साहाय्य करतील.’ नलाच्या अधिपत्याखाली आणि नीलाच्या साहाय्याने १० लक्ष वानरांनी अवघ्या २५ दिवसांत हा सेतु बांधला. पहिल्या पाच दिवसांतच मोठे वृक्ष आणि पर्वतांचे दगड वापरून सेतूचा पाया बांधला गेला. हा सेतु भारताच्या पंबन् द्विपाच्या धनुष्कोडी या टोकापासून श्रीलंकेच्या मन्नार द्विपावरील तलैमन्नार या टोकापर्यंत आहे. सेतु अनुमाने ३२ कि.मी. लांबीचा असावा. रामसेतूचा रक्षक हनुमंत आहे आणि हनुमंत चिरंजीव असल्याने तो सेतूच्या रक्षणासाठी सतत उभा आहे. उत्तर श्रीलंकेतील पश्‍चिम समुद्रतटावर मन्नार जिल्हा आहे. मन्नार शहर मन्नार द्वीपावर आहे. मन्नार शहरापासून ३५ कि.मी. दूर तलैमन्नार नावाचे टोक आहे. येथे श्रीलंका नौकादलाचे मोठे केंद्र आहे. तलैमन्नार येथील शेवटच्या टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होते. रामसेतु वरून पाहिल्यास १६ लहान द्विपे एकत्र असल्याप्रमाणे (द्वीपसमुहासारखे) दिसते. यांतील ८ द्विपे भारताच्या सरहद्दीत आणि ८ द्विपे श्रीलंकेच्या सरहद्दीत आहेत. दोन्ही राष्ट्रांकडून रामसेतु येथे जायला मनाई आहे. सेतूच्या सभोवतीच्या परिसरात केवळ मच्छिमारांना जायला अनुमती आहे. येथील वाळू स्वच्छ पांढरी आहे. वाळू हातात घेतल्यावर भावजागृती होते आणि ‘ती शरिराला लावावी’, असे वाटते. अन्य ठिकाणची वाळू आणि रामसेतु येथील वाळू, यांच्यात भेद आहे. येथील वाळूत अणुबॉम्ब बनवणार्‍या अणुभट्टीसाठी (‘न्यूक्लीयर रिअ‍ॅक्टर’साठी) लागणार्‍या ‘थोरियम’चा समावेश आहे.

प्रभु श्रीरामाशी संबंधित श्रीलंका आणि भारतातील विविध स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

सीतामातेने ज्या ठिकाणी अग्नीप्रवेश केला, त्या स्थानावरील अश्‍वत्थ वृक्ष आणि मंदिर. श्रीलंकेतील मध्य प्रांतातील अतीउंच पर्वतीय भागात हे स्थान आहे.
‘गुरुलूपोथा’ येथे रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या महालाच्या अवशेषांची छायाचित्रे ! सीतामातेचे रावणाने अपहरण करून तिला याच महालात ठेवले होते.
महाराणी मंदोदरीच्या महालाच्या दक्षिणेकडे असलेल्या या पायर्‍या उतरून सीतामाता तेथे असलेल्या नदीत आंघोळीसाठी जात असत !
‘सीतामातेच्या शोधात आलेल्या रामभक्त हनुमंताने या दगडावरून ज्या अशोक वृक्षाखाली सीतामाता बसली होती, त्या वृक्षावर झेप घेतली’, असे म्हणतात. दगडावर त्याचे पाऊल उमटले आहे.
 

श्रीरामाची आरती

श्रीरामाची आरती – संदर्भ सनातन संस्था

वरील अमुल्य माहिती संदर्भ – परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी सनातन संस्था