राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल दरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिल दरम्यान आणि कोकणात १५ ते १७ एप्रिल या कालावधीत काही भागांमध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. या काळात तापमानात वाढ होऊन नागरिकांना उष्म्याचा त्रास जाणवू शकतो.
नागरिकांसाठी आवश्यक सूचना
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, ORS सारखे द्रवपदार्थ घेणे आणि हलके, सैल व सूती कपडे वापरणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. शक्यतो सावलीत राहणे आणि गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे.
विशेषतः लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळणे गरजेचे आहे. मद्यपान तसेच कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि शरीरावर अतिरिक्त ताण येईल असे काम टाळावे. तसेच लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात उभ्या असलेल्या वाहनात ठेवू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
प्रशासनाची तयारी
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, जिल्हास्तरावर Heat Action Plan लागू करणे आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा साठा ठेवणे यावर भर दिला जात आहे.
याशिवाय शाळांना आवश्यक सूचना देणे, गरजेनुसार शाळांच्या वेळापत्रकात बदल करणे आणि विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे कामही सुरू आहे.
विशेष सूचना आणि खबरदारी
सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना सावली, पिण्याचे पाणी आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. शक्य असल्यास कार्यक्रमांच्या वेळेत बदल करावा.
कामगार, शेतकरी आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत काम करावे. नियमित पाणी पिणे, वेळोवेळी विश्रांती घेणे आणि उष्माघाताची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योग क्षेत्राला आवाहन केले आहे की, दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून उष्णतेच्या लाटेमुळे होणारे संभाव्य धोके कमी करावेत.

