देशभरात १०६ टक्के पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

4

देशात यावर्षी सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान दीर्घ सरासरीच्या १०६ टक्के पाऊस बरसण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, यावर्षी मान्सूनमध्ये संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोसमी पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस पडल्यास तो सामान्य पाऊस गणला जातो. यंदा १०६ टक्के पाऊस होणार आहे. जर पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १०५ ते ११० टक्क्यांदरम्यान असेल तर तो सामान्यपेक्षा जास्त मानला जातो. यंदाच्या वर्षी देशभरातील मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सें.मी. असेल, असेही महापात्रा यांनी नमूद केले. 

गेल्या दोन वर्षांमध्ये बिहार, ओडिशा, पं. बंगाल इत्यादी राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यंदादेखील या भागात तशीच अवस्था असणार आहे.