पुण्याच्या सुनियोजित आणि गतिमान विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20

पुणे दि.१५- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहराच्या सुनियोजित आणि गतिमान विकासावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री.फडणवीस यांनी दिली.

बालेवाडी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून भविष्यातील शहर आहे. जगाच्या पाठीवर २१ व्या शतकातील ‘नॉलेज सिटी’ म्हणून नोंद असलेले पुणे शहर आहे, ही ज्ञाननगरी आहे. पुणे शहर विज्ञान आणि नाविन्यतेची राजधानी आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचा ‘मॅन्युफॅक्चरिंग हब देखील आहे. देशातील २० टक्के उत्पादन महाराष्ट्र करतो, त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. इथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता राहण्यालायक वातावरण निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, चांगल्या पर्यावरणाची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.

पुणे शहराला विकसित करण्यासाठी १५ स्मार्ट सिटीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग पुण्यात सुरू करण्यात येत आहे. पाण्याच्या पुनर्वापरही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरता येईल. मुळा-मुळा शुद्धीकरणासाठी १ हजार ९०० कोटींची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नदी निर्मळ होण्यास मदत होईल. पर्यावरण आणि गतिमान विकासात समन्वय साधत पुणेकरांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल.