डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) DRDO यांना पाकिस्तानातून आलेल्या ‘ई-मेल’मधून माहिती समोर येण्याची शक्यता !

6

पुणे – संशोधन आणि विकास संस्थेचे (डी.आर्.डी.ओ.चे) (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना पाकिस्तानातून आलेल्या ‘ई-मेल’मधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या ‘ई-मेल’ची तांत्रिक पडताळणी चालू असून कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांना कोणती संवेदनशील माहिती पाठवली ? तसेच सुरक्षाविषयक कोणती छायाचित्रे पाठवली ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या ‘ई-मेल’च्या उत्तरात पाकिस्तानकडून आलेल्या ‘ई-मेल’मध्ये काय म्हटले आहे ? हे समोर आल्यास या ‘रॅकेट’चा उलगडा होऊ शकेल. कुरुलकर यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप गंभीर असून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायाधीश एस्.आर्. नावंदर यांच्या न्यायालयाने कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

‘ए.टी.एस्.’च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठवल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ‘लॅपटॉप’ आणि भ्रमणभाषमधून याविषयीचे धागेदोरे मिळाले आहेत. याविषयीचा अहवाल ‘ए.टी.एस्.’कडून न्यायालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे. देशाच्या सुरक्षिततेला बाधा आणणारी माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याच्या शक्यतेवरून कुरुलकर यांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात येईल. सरकारी विशेष पारपत्राचा वापर करून कुरुलकर यांनी मागील वर्षी ६ देशांना भेटी दिल्या. या वेळी ते कुणाला भेटले ? हे शोधण्यात येत आहे.