ह्या राज्यांत शाळा सुरू होणार..

79

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी साखळी तुटलेली नाही. देशात आता अनलॉक ०.६ प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारकडून यासंबंधी अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र ३० नोव्हेंबरपर्यंत अनलॉक ५.०च्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊननंतर देशात अनलॉकच्या माध्यमातून अनेक सेवा आणि उद्योग सुरू करण्यात आले असून देशाची विस्कटलेली आर्थिक घडी देखील आता सावरत आहे. दरम्यान राज्यामधील शाळा पुन्हा कधी सुरू होणार यावर अद्यापही चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे.

काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहे, तर केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचे निर्णय राज्य सरकारवर सोपवले आहेत.

आजपासून आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रसोबतच अनेक राज्यांना पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे.

उत्तराखंडमध्ये आज पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. परंतु सध्या फक्त १० वी आणि १२वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जर का परिस्थिती नियंत्रणात असेल तर छोटे वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये सात महिन्यांनंतर शाळा सुरू करण्यात येणार आहेत. परंतु आज पासून ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तर २३ नोव्हेंबरपासुन ६वी ते ८वी पर्यंतचे वर्ग सुरू होतील.

आसाममध्ये आजपासुन शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातील फक्त सहावी ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.