आपल्या शरिरात ३ प्रकारचे मल असतात, पुरिष (शौचावाटे बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ), मूत्र (लघवी) आणि घाम. या ३ मलांपैकी मूत्र हे मूत्रपिंडामध्ये तयार होते.
आपल्या शरिरातील मूत्र मार्गाची ओळख होण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर चहा गाळण्याची क्रिया डोळ्यांसमोर आणावी लागेल. ज्याप्रमाणे चहा गाळणीतून कपात गाळला जातो, त्याप्रमाणे मूत्रपिंडांमध्ये येणारे रक्त गाळले जाते. गाळलेले रक्त मूत्रवाहिन्यांमधून मूत्राशयात जमा होत रहाते. मूत्राशय भरल्यानंतर मूत्र प्रवृत्तीची संवेदना निर्माण होऊन मूत्र शरिराबाहेर टाकले जाते. आपल्या शरिरात २ मूत्रपिंड असतात. मूत्रपिंडाच्या आत अनेक छोटे छोटे घटक रक्त गाळण्याची क्रिया करत असतात. त्यांना ‘नेफ्रोन’ असे म्हणतात.
🛜 सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा… https://thalaknews.com/join-our-group
रक्त गाळले जात असतांना शरिरासाठी आवश्यक ते घटक शरिरात पुन्हा शोषले जातात आणि नको असलेले पदार्थ पुढे शरिराबाहेर टाकले जातात. दिवसभरात १५० ते १८० लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त गाळण्याची क्रिया मूत्रपिंडांमध्ये होत असते; परंतु केवळ १ ते २ लिटर इतकेच मूत्र शरिराबाहेर टाकले जाते.
मूत्रपिंडाचे विविध कार्य
- मूत्र तयार करून त्याद्वारे युरिया, क्रिएटिनिन, युरिक ॲसिडसारखे टाकाऊ पदार्थ आणि पाणी यांना शरिराबाहेर टाकणे.
- शरिरातील पाण्याचे प्रमाण कायम राखणे.
- शरिरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण कायम राखणे.
- संप्रेरकांद्वारे (‘हार्मोन’द्वारे) रक्त निर्मितीसाठी प्रेरणा देणे.
- ‘रेनिन’ या पदार्थाद्वारे न्यून झालेला रक्तदाब वाढवण्यास साहाय्य करणे.
- मूत्रपिंडाच्या वर असलेल्या अंतःस्रावी ग्रंथी या शरिरातील चयापचय क्रियाही व्यवस्थित ठेवतात.
- आपण घेत असलेले औषध शरिराच्या बाहेर टाकण्यात मूत्रपिंड महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. आपण कोणते औषध घेत आहोत ? वैद्यांच्या सल्ल्याने घेत आहोत ना ? याचे काय दुष्परिणाम आहेत ? याविषयी जागरूकता निर्माण होणे पुष्कळ आवश्यक आहे. कोणतेही औषध मनाने न घेता वैद्यांच्या सल्ल्याने घेणे महत्त्वाचे आहे. वेदना सहन होत नाहीत; म्हणून मनाने वेदनाशामक घेणे, मनानेच प्रतिजैविक औषधे घेणे, हे मूत्रपिंडाचे कार्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते.
अशा प्रकारे मूत्रपिंड आपल्या शरिरात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. एक मूत्रपिंड निकामी झाल्यास दुसर्या मूत्रपिंडाचा पर्याय उपलब्ध असतो; परंतु दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यास मात्र आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. मूत्रामध्ये पाणी, क्षार आणि प्रथिने यांच्या चयापचयातील टाकाऊ पदार्थ असतात; परंतु विविध आरोग्याच्या तक्रारी असल्यास लघवीची चाचणी करून आजाराचे निदान केले जाते. उदा. मधुमेहाच्या विकारात लघवीमध्ये साखर आढळून येते, मूतखडा असल्यास लघवीमध्ये लालपेशी आढळून येतात, मूत्रमार्गात जंतूसंसर्ग झाला असल्यास पू निर्माण करणार्या पेशी आढळतात, तसेच युरिया, युरिक ॲसिड किंवा क्रिएटिनिन यांचे प्रमाण लघवीमध्ये अधिक आढळून येणे, हे विविध आजारांच्या संदर्भाने, तसेच मूत्रपिंडाचे कार्य नीट होत नसल्याचे दर्शवते.
🛜 सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा… https://thalaknews.com/join-our-group
मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग :
मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक जणांना बर्याच प्रमाणात होतांना आपल्याला दिसून येतो. आपल्या शरिराचा विविध जंतूंशी प्रतिदिन संपर्क येतच असतो. आपले शरीर बर्याच अंशी या जंतूंशी लढा देत असते; पण कधीतरी हा लढा निष्फळ ठरतो आणि आपल्याला जंतूसंसर्ग होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये होण्याचे प्रमाण अधिक असते. या संसर्गाची लक्षणे समजून घेऊन त्यावर योग्य वेळी औषधोपचार केल्यास आपल्याला वेळीच आजार आटोक्यात आणता येतो.

मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होण्याची कारणे
पुष्कळ वेळ लघवीचा वेग धरून ठेवणे. लांबच्या प्रवासामध्ये बर्याचदा असे आढळून येते की, वेळेत लघवीला जाणे शक्य होत नाही. ही परिस्थिती जंतूंची वाढ होण्यास कारणीभूत ठरते.
शारीरिक स्वच्छतेचा अभाव. विशेषतः स्त्रियांनी मासिक पाळीच्या कालावधीत योग्य ती स्वच्छता न राखल्यास जंतूसंसर्ग होऊ शकतो.
मधुमेह, शरिरातील पाण्याचे प्रमाण न्यून होणे यांमुळेही मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होऊ शकतो.
मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग झाल्यानंतर कष्टाने मूत्र प्रवृत्ती होते. अशा प्रकारे थोडी थोडी आणि कष्टाने होणार्या मूत्र प्रवृत्तीची कारणे आयुर्वेदात सांगितलेली आहेत. जसे की, आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करणे, अतीमद्यपान करणे, अतीप्रमाणात मासे खाणे इत्यादी.
लक्षणे
- वारंवार आणि थोडी थोडी मूत्र प्रवृत्ती होणे.
- लघवी करतांना जळजळ होणे.
- मूत्राला तीव्र गंध येणे.
- गडद पिवळ्या रंगाची आणि लालसर लघवी होणे.
- लघवी पूर्ण झाली नसल्याचे वाटणे.
- कधी कधी लघवीतून रक्तही येऊ शकते.
- लघवी करतांना वेदना होणे, तसेच कमरेत जांघेतही वेदना होतात.
मूत्र मार्गाचा जंतूसंसर्ग झाला आहे, हे बर्याचदा साध्या लघवीच्या तपासणीने निदान होते; परंतु वारंवार जंतूसंसर्ग होत असल्यास त्याचे कारण शोधण्यासाठी वैद्य आपल्याला पुढच्या पुढच्या तपासण्या करण्यास सांगू शकतात. जंतूसंसर्गाची लक्षणे दिसल्यास एक-दोन दिवसांत घरगुती उपचार करूनही आराम न मिळाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग झाल्यास घ्यावयाची काळजी
- ओटीपोटात आणि कमरेत होणार्या वेदनासाठी गरम पाण्याच्या पिशवीने शेकू शकतो.
- योग्य प्रमाणात पाणी पिणे, नारळ पाणी, लिंबू सरबत प्यावे. द्राक्ष, कलिंगड, डाळिंब यांसारखी फळे खाऊ शकतो.
- सुती अंतर्वस्त्र, तसेच सैलसर कपडे घालावेत.
- शीतपेये, कॉफी यांसारखे पदार्थ टाळावेत. मसालेदार, खारट आणि आंबट पदार्थ, दही, मासे टाळावेत.
- २५० मिलीलिटर पाण्यामध्ये २० मिलीलिटर लिंबाचा रस आणि दीड ग्रॅम खाण्याचा सोडा टाकून मिश्रण तयार करून प्यावे.
जंतूसंसर्ग होऊच नये, यासाठी घ्यावयाची काळजी
- पाणी पिण्याचे प्रमाण योग्य ठेवणे. लघवी अडवून ठेवू नये.
- शौचास जाऊन आल्यानंतर, तसेच शारीरिक संबंधाच्या नंतर विशेषतः स्त्रियांनी योग्य ती स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
- स्त्रियांनी मासिक पाळीच्या कालावधीत आणि नंतर शारीरिक स्वच्छतेसाठी कोणत्याही रासायनिक पदार्थांचा उपयोग करू नये. केवळ पाण्याने स्वच्छता करावी.
- वारंवार जंतूसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असल्यास अशा व्यक्तींनी पुष्कळ घाम आलेला असल्यास लगेचच घामाचे कपडे पालटावेत.
- – वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (संदर्भ – सनातन प्रभात )
टीप – वरील उपचार करताना वैद्यकीय सल्ला घ्यावा.








