भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने शनिवारी सकाळी एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करून पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा खंडन केले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालय, भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती दिली. हे ऑपरेशन जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर (ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला) पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आले.
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्टीकरण दिले की, भारताच्या पठाणकोट, उधमपूर, आदमपूर, भुज आणि भटिंडा येथील हवाई तळांना काही प्रमाणात नुकसान पोहोचले आहे.
कर्नल कुरेशी यांनी सांगितले की पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर 26 पेक्षा अधिक ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला. पंजाबमधील एअरबेस स्टेशनवर पहाटे 1.40 वाजता हाय-स्पीड मिसाईल हल्ला करण्यात आला. शिवाय श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील वैद्यकीय केंद्रे व शाळांच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले.
ही कारवाई पाकिस्तानच्या क्रीर वर्तनाची साक्ष देणारी आहे. नागरी पायाभूत सुविधा आणि लष्करी तळांवर हल्ला करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला आहे. याशिवाय, पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांच्या नावाखाली हवाई मार्गांचा गैरवापर केला आणि भारताविरोधात खोट्या बातम्याही पसरवल्या.
खोट्या माहितीचा पर्दाफाश
सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानकडून भारतीय लष्करी ठिकाणे, वीजपुरवठा आणि सायबर यंत्रणा उध्वस्त करण्यात आल्याचे दावे “पूर्णपणे खोटे” आणि “कल्पनारम्य” आहेत. “सर्व सुविधा पूर्ववत काम करत आहेत,” असे ते म्हणाले.
२६ ठिकाणी पाकचे हल्ले
भारताने मान्य केले की शनिवारी पहाटे पाकिस्तानकडून 26 लष्करी ठिकाणांवर ड्रोन, मिसाईल्स आणि एअरस्ट्राईकद्वारे हल्ले करण्यात आले. यात उधमपूर, पठाणकोट, भटिंडा, भुज आणि आदमपूर येथील एअरबेसचा समावेश होता. काही ठिकाणी साधनसामग्रीचे नुकसान झाले व काही जवान जखमी झाले. मात्र भारताने अनेक हल्ले अचूकपणे परतवले.
सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की पाकिस्तानने बऱ्याच ठिकाणी ड्रोन आणि शस्त्रधारी UAV चा वापर करून भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न केला. बारामुला, श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, जैसलमेर इत्यादी ठिकाणी त्यांचे आढळले.
“या घडामोडी ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असून अत्यंत धोकादायक पाऊल आहे,” असे त्यांनी नमूद केले.
माहिती युद्धावर प्रहार
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी स्पष्ट केले की S-400 क्षेपणास्त्र प्रणाली किंवा प्रमुख हवाई तळ उध्वस्त झाल्याच्या पाकिस्तानकडून केलेले दावे खोटे आहेत. “हे खोडसाळ प्रचार आहेत आणि त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे त्यांनी म्हटले.