फोंडा (गोवा): भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धात भारताचा विजय सुनिश्चित व्हावा यासाठी गोव्यातील फोंडा येथे विशेष शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्थेच्या वतीने २० ते २२ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसऱ्या टप्प्यात हा यज्ञ होणार आहे.

या दिव्य यज्ञासाठी देशभरातून आणि परदेशातून भाविक सहभागी होणार असून, २५ अनुभवी पुरोहित सप्तशती पाठ, यज्ञविधी, आहुती आणि पूर्णाहुतीसह शास्त्रोक्त पद्धतीने हे धार्मिक अनुष्ठान पार पाडणार आहेत. यज्ञाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारताच्या रक्षणासाठी व विजयासाठी सामूहिक प्रार्थना.

शतचंडी यज्ञाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

२० मे: दुपारी ४ ते रात्री ८

२१ मे: सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुपारी ४ ते रात्री ८

२२ मे: सकाळी ८.३० ते दुपारी १.३०


या यज्ञाच्या आधी, १७ ते १९ मे २०२५ दरम्यान फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. या महोत्सवात राष्ट्रधर्म, हिंदू समाजरक्षण आणि अध्यात्मिक जागृती याविषयी व्याख्याने, संतसभा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, हा यज्ञ सर्वांसाठी खुला असून इच्छुक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा शतचंडी यज्ञ भारताच्या संरक्षणासाठी एक सामूहिक आध्यात्मिक शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.