हिंदु धर्मात वेगवेगळ्या सणांच्या वेळी, व्रतांच्या वेळी किंवा अन्य वेळी उपवास केला जातो. मुसलमानांमध्येही रमझानच्या काळात उपवास केला जातो. उपवासामुळे शरिराला अनेक लाभ होतात, असे आता संशोधनातून समोर आले आहे. ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’चे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांनी निष्कर्ष काढला आहे की, उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी न्यून होते, त्यानंतर शरीर आधीपासून अस्तित्वात असलेली चरबी ही ऊर्जा म्हणून वापरण्यास प्रारंभ करते. त्याच्या साहाय्याने शरिरातील अतिरिक्त चरबी न्यून होऊ लागते. यामुळे वजन न्यून होण्यास साहाय्य होते.
शास्त्रज्ञांनी पुढे असेही म्हटले आहे की, उपवास करतांना केव्हा आणि किती खात आहात ?, यावर नियंत्रण ठेवावे लागेल. यामध्ये दिवसातील काही वेळ खावे लागते आणि काही वेळ उपाशी रहावे लागते. कोणताही उपवास करतांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
शास्त्रज्ञांना लक्षात आलेले उपवासाचे लाभ – उच्च रक्तदाब नियंत्रणात रहातो. हृदयाची गती योग्य रहाते. इन्सुलिन नियंत्रणात रहाते. खराब कोलेस्ट्रॉल न्यून होते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. नको असणारी चरबी जळण्यास साहाय्य होते. स्मरणशक्ती सुधारू लागते.