गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा केंद्र सरकारचे आवाहन

13

चीन आणि अमेरिकेत पुन्हा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चीन आणि अमेरिकेत कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ होत असलेल्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कोरोनाच्या परिस्थितीबाबत दर आठवड्याला आरोग्य मंत्रालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी माहिती दिली. चीनसह इतर काही देशांमध्ये कोविड-19 संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर, दर आठवड्याला कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्याचा केंद्र सरकारने घेतला आहे. याशिवाय, ज्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी ते करून घ्यावे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे.

विविध देशांमध्ये आठवड्याभरात कोरोनाचे समारे ३६ लाख रुग्ण आढळले आहेत. देशातील कोविडच्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तज्ज्ञांसोबत ही बैठक घेतली. नवीन प्रकाराचे आव्हान पेलण्यासाठी, संशयित आणि सकारात्मक प्रकरणे लवकर शोधणे, अलग ठेवणे, चाचणी करणे आणि योग्य व्यवस्थापन यावर भर देण्यात आला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग पूर्ण करण्यावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे. चाचणी-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि कोविडचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे योग्य करणे आवश्यक आहे, कारण जगात त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

बैठकीनंतर नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या बैठकीची माहिती दिली. पॉल म्हणाले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा फैलाव इतर देशांत होत असला तरी, याला घाबरण्याची गरज नाही. तथापि, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरावा. पुरेशा प्रमाणात टेस्टिंगची सुविधा आहे. त्यामुळे वेळीच टेस्ट करून घ्यावी आणि त्यानुसार उपाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान, काय उपाययोजना करायच्या याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.