पॅरिस (फ्रान्स) – आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (‘आयएयू’ने) अश्‍विन शेखर या भारतीय खगोलशास्त्रज्ञाच्या नावाने एका छोट्या ग्रहाचे नामकरण करून त्यांना सन्मानित केले आहे. याआधी असा सन्मान केवळ ५ भारतियांना मिळाला होता. आधुनिक भारतामध्ये मात्र हा सन्मान मिळणारे शेखर हे पहिलेच खगोलशास्त्रज्ञ आहेत.

विदेशी प्रसारमाध्यमांनुसार २१ जून या दिवशी अश्‍विन शेखर यांना हा सन्मान अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे आयोजित ‘क्षुदग्रह धूमकेतु उल्का संमेलना’त देण्यात आला. ‘आयएयू’नुसार अश्‍विन शेखर हे आधुनिक भारतातील पहिलेच उल्का खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अश्‍विन शेखर यांच्या नावाने संबंधित छोट्या ग्रहाचे नाव आता ‘(३३९२८) अश्‍विन शेखर = २००० एल्जे २७’ असे असेल. केवळ ३८ वर्षीय असलेले अश्‍विन शेखर हे सध्या फ्रान्स सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या पॅरिस येथील एका वेधशाळेत कार्यरत आहेत.

याआधी नोबेल पुरस्कार विजेते सी.व्ही. रमन आणि सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर, तसेच महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन्, खगोलशास्त्री डॉ. विक्रम साराभाई आणि ‘आयएयू, मनाली’चे माजी अध्यक्ष कल्लाट वेणु बप्पू यांच्या नावानेच अशा प्रकारे ग्रहांचे नामकरण करण्यात आले होते.