दिल्ली – मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, ती शूरता, वीरता, संवेदना, अध्यात्म आणि आधुनिकता यांचा अनोखा मिलाफ आहे. विशेषतः भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा संगम असलेल्या या भाषेने देशाला वेगवेगळ्या काळात मार्गदर्शन केले आहे. जेव्हा भारताला अध्यात्मिक ऊर्जा आवश्यक होती, तेव्हा संतांनी आपल्या भाषेत प्राचीन ज्ञान लोकांपर्यंत पोचवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज आणि संत रामदासस्वामी यांसारख्या थोर विभूतींनी समाजप्रबोधन घडवले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलताना म्हणाले, ‘‘मराठी भाषा ही महाराष्ट्र धर्माचा विस्तार करणारी आहे. संत रामदासस्वामींनी ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगितले होते आणि आजही मराठी संस्कृती ही त्याच ध्येयाने पुढे जात आहे.’’
संस्कृतीचे संवाहक म्हणून भाषा
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भाषेच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. ‘‘भाषा केवळ संवादाचे साधन नाही, ती संस्कृतीची वाहक असते. समाजाच्या जडणघडणीत भाषेची भूमिका अनन्यसाधारण असते. मराठीची सौंदर्यस्थळे, साहित्यिक योगदान आणि संत परंपरा यामुळे ती एका समृद्ध वारशाचा भाग आहे,’’ असे ते म्हणाले.
या संमेलनाला संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि विविध क्षेत्रांतील साहित्यिक उपस्थित होते.
‘छावा’ चित्रपटाचे कौतुक
यावेळी पंतप्रधान मोदींनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. ‘‘छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे कार्य या चित्रपटाने केले आहे,’’ असे सांगताच संमेलनात ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.






