राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे खुली होणार

34

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. नोकऱ्या गेल्या. सर्वसामान्य नागरिकांना अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद आहेत.

मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. याबाबत सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.