२ नव्या रेल्वे मार्गिकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

11

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. ६२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल आणि २१ लहान पुलांचं बांधकाम करण्यात आलं आहे. या नवीन मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळी मार्गिका उपलब्ध झाली असून त्यामुळे उपनगरी गाड्यांच्या आणखी ३६ फेऱ्या चालवणं शक्य झालं आहे.  तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय लोकललादेखील हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते.

स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबईचे मोठे योगदान आहे. आता आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नव्या सुविधांचा लाभ मुंबई आणि आसपासच्या शहरांना होणार असल्याचे यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. या प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्राचे आभार मानले. मोदीजींचे नेहमी सहकार्य महाराष्ट्राला लाभले आहे आणि कायम लाभेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.