Home Dinvishesh अग्निहोत्र करताना कोणते मंत्र म्हणावेत? सूर्योदय-सूर्यास्त वेळी आहुती देण्याची योग्य पद्धत

अग्निहोत्र करताना कोणते मंत्र म्हणावेत? सूर्योदय-सूर्यास्त वेळी आहुती देण्याची योग्य पद्धत

0

आज १२ मार्च विश्व अग्निहोत्र दिवस त्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वेबसाईट वरून संकलित केलेला लेख आपल्यासाठी…

भारतीय वैदिक परंपरेत अग्निहोत्र ही एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची साधना मानली जाते. पर्यावरण शुद्धीकरण, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा विधी केला जातो. विशेष म्हणजे अग्निहोत्र नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळी केला जातो. या वेळी विशिष्ट वैदिक मंत्रांचा उच्चार करून अग्नीत आहुती देण्याची प्रथा आहे.


अक्षतांची आहुती कशी द्यावी?
अग्निहोत्र करताना तांदळाच्या अक्षतांना तुपात भिजवले जाते. त्यानंतर मंत्रोच्चार करत या अक्षतांची अग्नीत आहुती दिली जाते. या प्रक्रियेमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले जाते.


सूर्योदयाच्या वेळी म्हणायचे मंत्र
सूर्य उगवत असताना अग्निहोत्र करताना पुढील वैदिक मंत्र म्हणण्याची परंपरा आहे:


सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतय इदं न मम ।


या मंत्रांच्या उच्चारासोबत अक्षतांची आहुती अग्नीत अर्पण केली जाते.


सूर्यास्ताच्या वेळी म्हणायचे मंत्र
सूर्य मावळताना अग्निहोत्र करताना वेगळे मंत्र उच्चारले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत:


अग्नये स्वाहा, अग्नय इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतय इदं न मम ।


या मंत्रांद्वारे अग्निदेव आणि प्रजापती यांना आहुती अर्पण केली जाते.


अग्निहोत्राचे महत्त्व


अग्निहोत्र ही केवळ धार्मिक क्रिया नसून ती एक वैदिक विज्ञानावर आधारित साधना मानली जाते. या विधीमुळे घरातील आणि परिसरातील वातावरण शुद्ध राहते, मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते.


आजच्या धावपळीच्या जीवनातही अनेक जण नियमितपणे अग्निहोत्र मंत्र आणि अग्निहोत्र विधी पाळतात. योग्य वेळ, शुद्ध भावना आणि मंत्रोच्चार यामुळे या साधनेचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळतो.

अग्निहोत्र करण्याचे लाभ


किरणोत्सर्गापासून संरक्षण

किरणोत्सर्गापासून, तसेच अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून रक्षण करते.

वातावरणाचे शुद्धीकरण

वायू शुद्ध करून प्रदूषण अल्प करते आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवते.

नकारात्मक स्पंदने नष्ट होणे

वातावरणातील नकारात्मक स्पंदनांपासून रक्षण होत असल्याने मानसिक ताण दूर होतो आणि सात्त्विक स्पंदनांत वृद्धी होते.

निसर्ग आणि वास्तु यांना पूरक असणे

निसर्ग संतुलित करून त्या स्थानातील पर्यावरणातील असंतुलन दूर करते.

रोगजंतूंचे निरोधन

अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो.


पर्यावरण आणि शेतीसाठी लाभदायक

औषधीय, तसेच चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करते. अग्निहोत्राची रक्षा (राख) मातीची सुपीकता वाढवते, पिकांची वाढ चांगली करते आणि धान्य, फळे, भाज्या यांचे पोषणमूल्य सुधारते.


मानसिक स्वास्थ्य सुधारणे

अग्निहोत्रामुळे मन शांत आणि तणावमुक्त होते, इच्छाशक्ती वाढते, तसेच व्यसनांवर मात करण्यासाठी साहाय्य होते, मुलांच्या वागणुकीत चांगले पालट दिसून येतात, त्यांची एकाग्रता वाढते आणि सर्व वयोगटातील लोकांचे भावनिक स्थैर्य वाढवते.


आध्यात्मिक आणि संरक्षक ऊर्जा देणे

अग्निहोत्रामुळे दैवी संरक्षक-कवच निर्माण होते, देवतांची सूक्ष्म शक्ती आकृष्ट होते, अध्यात्मिक प्रगतीस अनुकूलता मिळते. प्राणशक्तीची शुद्धी होऊन मन आनंद आणि ध्यानावस्था अनुभवते. त्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते.