भारतातील आदर्श उद्योगपती, ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित, जागतिक यशाच्या शिखरावरील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून नावाजलेले, तसेच टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा असणारे रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला रात्री ११.३० वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. टाटा हे अनेक उद्योगपतींचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे ‘उद्योगसमूहातील ध्रुवताराच जणू अस्ताला गेला’, असे सर्वांना वाटले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ‘स्टेटस’ अनेकांनी ठेवले. त्यांच्या संदर्भातील पोस्टही सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागल्या. पदापेक्षा देशासाठी आयुष्य समर्पित करणारे रतन टाटा यांच्याविषयी लहानथोर प्रत्येकाच्याच मनात एक विशेष स्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाटांविषयी व्यक्त होतांना म्हटले, ‘‘रतन टाटा म्हणजे दूरदर्शी व्यापारी नेतृत्व, दयाळू व्यक्तीमत्त्व होते. नम्रता, दयाळूपणा आणि समाजाप्रतीची अतूट बांधीलकी यांमुळे ते लोकप्रिय ठरले. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे.’’ टाटा यांचे भारतीय समाजासाठीचे कार्य स्पृहणीय आणि अतुलनीय होते. त्यांनी जे केले, त्याला नैतिकतेचा पाया होता. त्यामुळेच ते जीवनात यशस्वी झाले आणि माणुसकीचा आदर्श म्हणूनच आज भारतियांसमोर ते श्रेष्ठ मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ ठरले !
९० च्या दशकात टाटा मोटर्स तोट्यात गेले होते. तेव्हा त्यातील पॅसेंजर कारचा व्यवसाय विकण्याचा निर्णय टाटा यांनी घेतला. अमेरिकेतील कार निर्माते आस्थापन असणार्या ‘फोर्ड मोटर्स’समवेत त्यांचे बोलणे झाले. फोर्ड आस्थापनाचे अध्यक्ष बिल फोर्ड यांनी टाटा यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘‘काही ठाऊक नाही, तर तुम्ही हा व्यवसाय का चालू केला ? जर मी तुमच्यासमवेत हा व्यवहार केला, तर माझे तुमच्यावर मोठे उपकार होतील.’’ झालेला अवमान निमूटपणे गिळून अत्यंत शालीनतेने व्यवसाय विकण्याचा निर्णय टाटा यांनी रहित केला. अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर त्यांनी झालेल्या घटनेची कुठेही वाच्यता न करता संपूर्ण लक्ष कारच्या क्षेत्राच्या भरभराटीकडे दिले. यासाठी त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. ९ वर्षांनंतर टाटा मोटर्सने भरारी घेत संपूर्ण विश्वात पुन्हा एकदा नावलौकिक मिळवला आणि दुसरीकडे ‘फोर्ड’ आस्थापनाच्या नाकावर टिच्चून भारतीयत्वाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. ‘टाटा मोटर्स’चे यश आसमंताला गवसणी घालत असतांनाच फोर्ड आस्थापन तोट्याची झळ सोसत होते. फोर्ड यांनी जरी टाटा यांचा अवमान केलेला असला, तरी माणुसकी जपणारे टाटा यांनी तो लक्षात न ठेवता फोर्ड आस्थापनाला साहाय्याचा हात पुढे केला. त्यामुळे बिल फोर्ड यांना मुंबईत टाटा यांचे पाय धरायला यावे लागले. अशा या आगळ्यावेगळ्या आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाविषयी कितीही लिहिले, तरी अल्पच आहे.
रतन टाटा यांच्यासारख्या महापुरुषाला कोटी कोटी प्रणाम
संदर्भ – दैनिक सनातन प्रभात