अयोध्या – येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला निमंत्रितांना प्रवेश असला, तरी सद्य:स्थितीत सर्वसामान्यांना श्रीरामललाचे दर्शन घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. १८ जानेवारी या दिवशी सहस्रावधी भाविकांनी अयोध्या येथे येऊन श्रीरामललाचे दर्शन घेतले. श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराममंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर चालू आहे, तर दुसर्या बाजूला श्रीरामलालाच्या दर्शनासाठी नियमित सहस्रावधींच्या संख्येने भाविक अयोध्येत येत आहेत. १८ जानेवारी या दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला.
श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी दर्शनाला जाणार्या भाविकांना पोलीस आणि सैनिक यांच्याकडून संपूर्णपणे सहकार्य करण्यात येत आहे; मात्र सुरक्षिततेच्या कारणामुळे श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी लेखणी, कंगवा, हातातील कडे आदी कोणत्याही प्रकारच्या वस्तू नेण्यास सक्त प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असले, तरी या वस्तूंमुळे कुणीही भाविक दर्शनापासून वंचित राहू नये, यासाठी प्रवेशद्वाराच्याच ठिकाणी या वस्तू ठेवण्यासाठी ‘लॉकर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत सहस्रावधी भाविक आले आहेत. देशातील विविध देवस्थाने आणि भाविक यांच्या वतीने भाविकांसाठी विनामूल्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत या ठिकाणी सहस्रावधी भाविकांची व्यवस्था होत आहे.