मुंबई, दि. 10 : मुंबई मॅरेथॉन ही श्रीमंत – गरीब, शहरी – ग्रामीण, युवा – वृद्ध, स्त्री – पुरुष यांसारखे भेद मिटवणारी सर्वसमावेशक स्पर्धा आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा पुरस्कार करते. प्रत्येक गाव, शहर व महानगराची स्वतःची मॅरेथॉन सुरु झाल्यास त्यातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल व एकात्मता बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या स्वतःच्या नावनोंदणीने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार आशिष शेलार, मॅरॅथॉनचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंह, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.