ठाणे : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार भरत गोगावले, बालयोगी सदानंद महाराज, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते. यावेळी मिरा रोड (पू.) येथील आरक्षण क्र. २४८ येथील सद्गुरू सदानंद महाराज सभागृह व कै. हरिचंद्र आमगावकर जिमनॅस्टीक सेंटर या इमारतीचे भूमिपूजन, केंद्र शासनाच्या हवेची गुणवत्ता सुधारणा निधी मधून प्राप्त विविध कामांचे लोकार्पण, आमदार निधीतील आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण, मिरा भाईंदर शहरातील महानगरपालिकेच्या निधीतील व शासनाच्या निधीतील सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, मिरा भाईंदर महानगरपालिकेची सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आधारित वाढीव मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्था भूमिपूजन, मिरा भाईंदर महानगरपालिकेची भुयारी गटार योजना टप्पा- २ (भाग-१), नगर विकास विभागाकडील मुलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेतील विविध कामांचे भूमिपूजन, भाईंदर (पूर्व) इंद्रलोक आरक्षण क्र. ११५ मधील शाळा इमारतीचे लोकार्पण. काशिमिरा येथील प्रभाग समिती क्र.०६ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे इमारतीचे लोकार्पण. भाईंदर (प.) रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार लोकार्पण. किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार लोकार्पण, माणिकपुर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे लोकार्पण आदी कामांचे आज लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त काढण्यात आलेल्या गाण्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच महिला बचतगटांना विविध व्यावसायिक साहित्याचे वाटपही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाले.
मिरा भाईंदर महापालिकेच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मिरा भाईंदर हे शहर मुंबई व ठाणे शहराच्या बरोबरीने पुढे यायला हवे. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. भाईंदर ते दहिसर लिंक रोडचे काम हाती घेणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांचा टोलचा प्रश्न मिटेल. तसेच मुंबई सागरी किनारा मार्गही विरार ते थेट पालघर पर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच बांद्रा – वर्सोवा आता विरार पर्यंत आणणार आहे. तसेच मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख केली असून राज्यातील साडेबारा कोटी जनतेला त्याचा लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी लेक लाडकी लखपती योजनेतून मुलींच्या बँक खात्यात निधी देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात यासह अनेक निर्णय हे सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार श्री. सरनाईक व आमदार श्रीमती जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. आयुक्त श्री. ढोले यांनी प्रास्ताविकात विकास कामांची माहिती दिली.