नाशिक – आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील, दुसऱ्या दिवशी छाननी होईल आणि 6 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 मे रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान आज पहिल्याच दिवशी शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे बाबाजी भक्तगण परिवाराने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान देखील केले होते. अनुष्ठानाच्या सांगतेवेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
नाशिक शहरात बाबाजी परिवाराकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजाराहून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार सहभागी झाला होता. आज अखेर शांतीगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतिगिरी महाराजाचे मुळ गाव आहे. त्यामुळे त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला.