नवी दिल्ली: देशात करोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. या मुळे केंद्र सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी या वाढीचा अभ्यास करण्यासाठी पथकांची निर्मिती केली आहे. ही पथके विविध राज्यांचा दौरा करून तेथील परिस्थितीचा अहवाल सादर करतील.

दिल्लीतील स्थिती पुन्हा बिघडली

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याकारणाने सरकारची चिंता वाढली आहे. दिल्लीत तर पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील परिस्थिती पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक आवश्यक त्या सूचना केल्या. आता दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया देखील विविध राज्यांमध्ये काही पथके पाठवण्याची तयारी करत आहेत.

केंद्र सरकारची पथके तैनात

केंद्र सरकारची ही पथके हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि मणिपूरचा दौरा करतील. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया तीन सदस्यांच्या पथकाचे नेतत्व करतील. हे पथक हरयाणाचा दौरा करेल. या व्यतिरिक्त डॉक्टर व्ही. के. पॉल (नीती आयोगाचे सदस्य) राजस्थान, डॉक्टर एस. के. सिंह (एनसीडीसीचे संचालक) गुजरात पथकाचे नेतृत्व करतील. या व्यतिरिक्त, उपमहासंचालक डॉ. स्वस्तिचरण हे मणिपूरच्या पथकाचे नेतृत्व करतील.

संदर्भ व अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स