लक्ष्मीपूजनाचा इतिहास:
दिवाळीच्या अमावास्येच्या दिवशी श्रीविष्णूने देवी लक्ष्मी व इतर सर्व देवतांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन विश्रांतीस गेले, अशी आख्यायिका आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे.
लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत:
पहाटे स्नान करून देवपूजा करतात, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मण भोजन करतात. संध्याकाळी फुलांच्या माळांनी सजवलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णू आणि कुबेर यांची पूजा केली जाते.
चौरंगावर अक्षतांनी अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक रेखाटून देवीची मूर्ती बसवली जाते. कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून लवंग, वेलची, साखर, आणि गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. पूजा झाल्यानंतर गूळ, धने, लाह्या, बत्तासे वाटले जातात आणि रात्री जागरण करतात.
अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात भक्ती, शुचिता, कर्तव्यनिष्ठा आणि पवित्रता असते तेथे ती वास करते.
लक्ष्मीपूजनाचे महत्त्व:
सामान्य अमावस्या अशुभ मानली जाते, पण दिवाळीची अमावस्या शुभ आणि आनंददायक मानली जाते. हा दिवस धन, सुख, समृद्धी आणि नवीन प्रारंभाचे प्रतीक आहे.
श्री लक्ष्मीदेवीची प्रार्थना:
‘हे लक्ष्मीदेवी, आम्ही तुझ्या कृपेने मिळालेल्या धनाचा सदुपयोग केला आहे. आमच्या खर्चावर तुझे आशीर्वाद राहू दे आणि पुढील वर्षही सुख, शांती व समृद्धीचे जावो.’
आध्यात्मिक महत्त्व:
लक्ष्मी व सरस्वती देवींची एकत्र प्रार्थना केल्याने माणसातील अहंभाव नाहीसा होतो व त्याच्यात विनम्रता आणि आत्मशांती निर्माण होते.
श्री लक्ष्मी-कुबेर पूजाविधी:
पूजेत आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, पंचामृत, गंध, वस्त्र, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, आरती आणि प्रार्थना या सर्व विधींचा समावेश असतो. शेवटी मंत्रपुष्पांजली अर्पण करून देवीला नमस्कार करतात.
आवाहन
महालक्ष्मि समागच्छ पद्मनाभपदादिह ।
पूजामिमां गृहाण त्वं त्वदर्थं देवि संभृताम् ।।
(हे महालक्ष्मी, श्रीविष्णूच्या चरणकमलापासून तू येथे ये आणि तुझ्यासाठी एकत्रित केलेल्या पूजेचा स्वीकार कर.)
उजव्या हातात अक्षता घ्या.
(प्रत्येक वेळी अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ (अंगठा) एकत्र करूनच वहाव्यात.)
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । आवाहयामि ।।
(हात जोडावेत.)
आसन
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
(श्री लक्ष्मीकुबेराच्या चरणी अक्षता वहाव्यात.)
(हे लक्ष्मी, तू कमळामध्ये निवास करतेस तेव्हा माझ्यावर कृपा करण्यासाठी तू या कमळामध्ये निवास कर.)
(पूजेसाठी छायाचित्र असल्यास फुलाने अथवा तुळशीपत्राने पाणी प्रोक्षण करावे. मूर्ती अथवा प्रतिमा असल्यास आपल्यासमोर ताम्हणामध्ये ठेऊन पुढील उपचार समर्पित करावेत.)
पाद्य
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पाद्यं समर्पयामि ।।
(उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.)
अर्थ : प्रवासाचे सर्व श्रम दूर व्हावे म्हणून गंगोदकाने युक्त नाना मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी पाय धुण्यासाठी देतो.
अर्घ्य
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । अर्घ्यं समर्पयामि ।।
(डाव्या हाताने पळीभर पाणी भरून घ्या. त्या पाण्यात गंध-फूल अक्षता घाला. उजव्या हाताने पळीतील पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी वहा.)
अर्थ : भक्तावर उपकार करणार्या हे महालक्ष्मी, पापे नष्ट करणार्या आणि पुण्यकारक अशा तीर्थोदकाने केलेले हे अर्घ्य ग्रहण कर.
आचमन
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । आचमनीयं समर्पयामि ।।
(उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.)
अर्थ : हे जगदंबिके कापूर, अगरु यांनी समिश्र असे थंड आणि उत्तम असे पाणी तू आचमन करण्यासाठी ग्रहण कर.
स्नान
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । स्नानं समर्पयामि ।।
(उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.)
अर्थ : हे महालक्ष्मी, कापूर, अगरु यांनी सुवासित असे सर्व तीर्थांतून आणलेले पाणी तू स्नानासाठी ग्रहण कर.
पंचामृत
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पंचामृतस्नानं समर्पयामि। तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।।
(दूध, दही, तूप, मध व साखर एकत्र केलेले देवीच्या चरणी वहावे. त्यानंतर पळीभर शुध्द पाणी घालावे.)
अर्थ : हे देवी, मी दिलेले दूध, दही, तूप, मध व साखर यांनी युक्त असलेले पंचामृत स्नानासाठी ग्रहण कर.
गंधाचे स्नान
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । गंधोदकस्नानं समर्पयामि ।।
(पळीभर पाणी घ्यावे. त्यात गंध घालून ते पाणी देवीच्या चरणी वहावे.)
अर्थ : कापूर, वेलची यांनी युक्त आणि सुगंधित द्रव्यांनी युक्त असे मी दिलेले हे गंधाचे पाणी स्नानासाठी ग्रहण कर.
महाभिषेक
(आपल्या अधिकारानुसार श्रीसूक्त/पुराणोक्त देवीसूक्त यांनी अभिषेक करावा.)
त्यानंतर मूर्ती अथवा प्रतिमा आपल्यासमोर ताम्हणात घेतली असल्यास स्वच्छ धुवून पुसून परत मूळ स्थानी ठेवावी आणि पुढील पूजा करावी.
वस्त्र
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासनिर्मिते वस्त्रे समर्पयामि ।।
(देवीला कापसाचे वस्त्र आणि उपवस्त्र वहावे.)
अर्थ : तंतूच्या सातत्यामुळे तंतूमय असे आणि कलाकुसरीने युक्त, शरीराला अलंकृत करणारे असे हे श्रेष्ठ वस्त्र हे देवी तू परिधान कर.
कंचुकीवस्त्र
श्री लक्ष्म्यै नमः । कंचुकीवस्त्रं समर्पयामि ।।
(उपलब्धतेनुसार साडी, चोळी अर्पण करावी.)
अर्थ : हे विष्णुवल्लभे मोत्यांच्या मण्यांच्या समूहाने युक्त अशी सुखद आणि (अनमोल) अमोल अशी चोळी मी तुला देतो.
गंध
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।।
(गंध लावावे.)
अर्थ : मलय पर्वतावर झालेले, अनेक नागांनी रक्षण केलेले अत्यंत शीतल आणि सुगंधित असे हे चंदन स्वीकार कर.
हळदकुंकू
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।।
(हळदकुंकू वहावे.)
अर्थ : हे ईश्वरी, मी आणले हे ताटंक, हळदीकुंकू, अंजन, सिंदूर आणि आळीता आदी सौभाग्यद्रव्य तुला देतो (याचा स्वीकार कर).
अलंकार
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । अंलकारार्थे नानाभरणभूषणानि समर्पयामि ।।
(उपलब्धतेनुसार सौभाग्यालंकार अर्पण करावे.)
अर्थ : हे देवी, रत्नजडीत कंकणे, बाहूबंध, कटिबंध, कर्णभूषणे, पैंजण, मोत्यांचा हार, मुकुट आदी अलंकार तू धारण कर.
पुष्प
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि तुलसीपत्राणि दुर्वांकुरांश्च समर्पयामि ।।
(फुले, तुळशी, बेल, दूर्वा तसेच उपलब्धतेनुसार पत्री अर्पण करावी.)
अर्थ : हे लक्ष्मी, प्राप्त झालेल्या सुगंधामुळे आनंदित आणि मत्त अशा भ्रमरांच्या समूहामुळे व्यापलेला नंदनवनातील फुलांचा संचय तू घे.
धूप
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । धूपं समर्पयामि ।।
(उदबत्ती ओवाळावी.)
अर्थ : हे देवी, अनेक झाडांच्या रसापासून उत्पन्न झालेल्या सुगंधीत गंधांनी युक्त, जो देव, दैत्य व मानवांनाही आनंदकारक आहे. अशा धूपाला तू ग्रहण कर.
दीप
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । दीपं समर्पयामि ।।
(नीरांजन ओवाळावे.)
अर्थ : सूर्यमंडल, अखंड चंद्रबिंब आणि अग्नि यांच्या तेजाला कारणीभूत असणारा, असा हा दीप मी भक्तीस्तव तुला सादर केला आहे.
(उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळशीचे पान हातातच धरून ठेवावे आणि आपल्या दोन्ही डोळ्यांवर डावा हात ठेवून नैवेद्य दाखवत पुढील मंत्र म्हणत नैवैद्य समर्पण करावा.)
(लवंग, वेलची, साखर घातलेले दूध तसेच लाडू यांचा नैवेद्य दाखवावा.)
नैवेद्य
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । नैवेद्यार्थे एला-लवंग-शर्करादि-मिश्रगोक्षीरलड्डुकादि-नैवेद्यं निवेदयामि ।।
प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः ।
उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।।
(हातातील तुळशी देवीच्या चरणी वहाव्या. नंतर उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.)
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । नैवेद्यं समर्पयामि ।।
मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
(देवीला गंधफूल वहावे.)
अर्थ : स्वर्ग, पाताळ आणि मृत्यूलोक यांना आधार असणारे धान्य व त्यापासून तयार केलेला सोळा आकारांचा नैवेद्य आपण स्वीकार करावा.
फल
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि ।।
(पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते विडा, सुपारी यांवर सोडावे.)
अर्थ : हे देवी, हे फळ मी तुला समर्पण करण्यासाठी ठेवतो, त्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये मला चांगल्या फलांची प्राप्ती होवो. कारण या चराचर त्रैलोक्यामध्ये फळामुळेंच फलप्राप्ती होतांना दिसते म्हणून या फलप्रदानामुळे माझे मनोरथ पूर्ण होवो.
तांबूल
अर्थ : हे देवी, मुखारविंदाचे भूषण असणारा, अनेक गुणांनी युक्त असणारा, ज्याची उत्पत्ति पाताळात झाली, असा माझ्याकडून दिला जाणारा विडा तू ग्रहण कर.
आरती
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । महानीरांजनदीपं समर्पयामि ।।
(देवीची आरती म्हणावी.)
अर्थ : चंद्र, सूर्य, पृथ्वी, वीज,अग्नी यांमध्ये असणारे तेज हे तुझेच आहे. (अशी किती ही तेजे तुझ्यावरून ओवाळून टाकावी.)
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ।।
(कापूर (कर्पूर) दाखवावा.)
अर्थ : कापूराप्रमाणे गोरा असणार्या, करूण रसाचा अवतार असणार्या, त्रैलोक्याचे सार असणार्या ज्याने नागराजाला आपला कंठहार केला आहे, जो सर्वकाळ हृदय कमलामध्ये निरंतर वास करतो, अशा पार्वतीसहीत असणार्या शंकराला, मी नमस्कार करतो.
नमस्कार
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । नमस्कारान् समर्पयामि ।।
(देवीला नमस्कार करावा.)
अर्थ : इंद्रादि देवतांच्या शक्ती असणार्या, त्याचप्रमाणे महादेव, महाविष्णू, ब्रह्मदेवाची शक्ती असणार्या, मंगलरूप असणार्या, सुख करणार्या अशा हे मूळ प्रकृतिरूप असणार्या देवी तुला आम्ही सर्व नम्र होऊन सतत नमस्कार करतो.
प्रदक्षिणा
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । प्रदक्षिणान् समर्पयामि ।।
(स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.)
अर्थ : मी जी जी काही पातके या जन्मात अथवा अन्य जन्मांत केली असतील, ती ती सर्व पातके प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलोपावलीं नष्ट होतात. तूच माझा आश्रय आहेस तुझ्याशिवाय माझा रक्षणकर्ता दुसरा कुणीही नाही; म्हणून हे जगदंबे! करुणभावाने तू माझे रक्षण कर.
मंत्रपुष्पाजंली
श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।।
(गंध, फूल व अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना दोन्ही हातांच्या ओंजळीने देवीच्या चरणी वहाव्यात.)
अर्थ : हे लक्ष्मी, विष्णूच्या धर्मपत्नी तू ही पुष्पांजली घे आणि या पूजेचे यथायोग्य फल मला प्राप्त करून दे.
प्रार्थना
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
(हात जोडून देवीची आणि कुबेराची प्रार्थना करावी.)
अर्थ : हे विष्णप्रिये तू वर देणारी आहेस, तुला मी नमस्कार करतो, तुला शरण आलेल्यांना जी गति प्राप्त होते, ती गति तुझी पूजा केल्याने मला प्राप्त होवो. जी देवी लक्ष्मी (तेजाच्या सौंदर्याच्या) रूपाने सर्व भूतांत निवास करते. तिला मी त्रिवार (तीन वेळा) नमस्कार करतो. संपत्तीच्या राशींचा अधिपति असणार्या हे कुबेरा तुला मी नमस्कार करितो. तुझ्या प्रसन्नतेने मला धनधान्य संपत्ती प्राप्त होवो.)
महत्त्वाच्या सूचना:
पूजा करताना पवित्र वस्त्र (धोतर-उपरना) परिधान करावे.
तिजोरी, हिशोबाची वही आणि व्यापारातील साधनांची पूजा करावी.
पूजा स्थळ स्वच्छ व सुगंधित ठेवावे.






