जकार्ता (इंडोनेशिया) – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे सध्या इंडोनेशियाच्या दौर्यावर आहेत. येथे ते दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या ‘आसियान’ गटाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आले आहेत. आतंकवादाच्या सूत्रावर ‘समान, एकात्मिक आणि शून्य सहिष्णुता’ असणारा दृष्टीकोन ठेवण्याचा आग्रह त्यांनी ‘आसियान’च्या सदस्य देशांकडे केला. या वेळी जयशंकर म्हणाले की, आतंकवादाला संरक्षण आणि पोषण देणार्यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.
जकार्तामध्ये आसियानच्या मंत्रीस्तरीय बैठकीला संबोधित करतांना डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत आतंकवादाशी दोन हात करण्यासाठी वैश्विक सहयोगाला प्रोत्साहन देऊन वैश्विक आव्हानांना तोंड देत आहे. देशांमधील वाद संपवण्यासाठी कूटनीतीचा प्रयोग केला पाहिजे.
चीनसंदर्भात बोलतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, आम्ही शांती आणि स्थिरता यांना कमकुवत करणार्या चिनी कारवायांमुळे चिंतित आहोत. कोणत्याही आचारसंहितेच्या कार्यवाहीच्या वेळी तिसर्या पक्षाचे अधिकार आणि हित यांच्यावर प्रतिकूल परिणाम होता कामा नये.
चीन दक्षिण चीन सागराच्या संपूर्ण क्षेत्रावर स्वत:चा दावा सांगतो. तैवान, फिलीपीन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम हे दक्षिण पूर्वी देशही या सागरातील काही भागांवर दावा करतात. चीनने या सागरात कृत्रिम बेटे उभारली असून सैन्य प्रतिष्ठानांची स्थापनाही केली आहे