आजकाल अनेकांमध्ये पुरेसा आहार घेऊनसुद्धा रक्तातील ‘हिमोग्लोबिन’, ‘कॅल्शियम’ यांसारखे घटक न्यून असणे, तसेच थकवा येणे, उत्साह नसणे, शरीर कृश असणे इत्यादी लक्षणे आढळतात. शरिराची आहार उत्तम रितीने पचवण्याची सिद्धता नसतांना खाल्ल्यास आहार नीट पचत नाही आणि अन्नातील पोषकांश शरिराला मिळत नाहीत. यामुळे असे होते.
आहारातील पोषकांश शरिराला पूर्णपणे उपलब्ध होण्यासाठी सकाळचा पहिला आहार जठराग्नी प्रदीप्त झाल्यावरच (अन्न पचवण्याची क्षमता निर्माण झाल्यावरच) घ्यावा. सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्यास त्याला अन्नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्वच्छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही जठराग्नी प्रदीप्त झाल्याची लक्षणे आहेत. (केवळ ‘भूक लागणे’ हे जठराग्नी प्रदीप्त झाल्याचे लक्षण नव्हे.) ही लक्षणे निर्माण होत नसतील, तर रात्रीचे जेवण ८ वाजण्यापूर्वी, तसेच अल्प प्रमाणात जेवावे. असे केल्याने सकाळपर्यंत ते नीट पचून जठराग्नी प्रदीप्त होतो.
जठराग्नी प्रदीप्त झाल्यावरच सकाळचा पहिला आहार घेण्याचा नियम केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, संधीवात यांसारख्या विकारांमध्येही चांगला लाभ दिसून येतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३) संदर्भ – दैनिक सनातन प्रभात