Nuclear Explosion With Orange Mushroom Cloud

अणूबॉम्ब’मध्ये (Atomic Bomb) युरेनियम अथवा प्लुटोनियम यांच्या अणू विच्छेदीकरणाने ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी अणूच्या केंद्रकात ‘न्यूट्रॉन’ने प्रहार केले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते. या प्रक्रियेला ‘नाभिकीय विखंडन’ असे म्हणतात. अणूबॉम्ब विमान अथवा क्षेपणास्त्र यांद्वारे टाकण्यात येतो.’ (संदर्भ : माय करियर, संकेतस्थळ)

जेव्हा भूमीच्या अगदी जवळ अणूबॉम्बचा स्फोट होतो, तेव्हा तो ०.१ मिलीसेकंदापेक्षाही अल्प वेळ टिकतो. तेव्हा ३० मीटर व्यासाचा आणि ३ लक्ष अंश सेल्सिअस उष्णतेचा आगीचा लोळ निर्माण होतो. ही उष्णता सूर्याच्या उष्णतेच्या ५० पट अधिक असते. या लोळाचे चमकदार वायूमध्ये रूपांतर होते. त्याला ‘फायरबॉल’ असे म्हणतात. तो किरणोत्सारी पदार्थ उत्सर्जित करत जातो. या ‘फायरबॉल’चा आकार केवळ २ सेकंदांत २ किलोमीटर इतक्या वेगाने वाढत जातो. या वेळी हवेतून भूमीवर निर्माण झालेल्या दाबामुळे कंपन लहरींची (‘शॉक वेव्हज्’ची) निर्मिती होते. कंपन लहरींचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक असतो. यामुळे स्फोट झालेल्या भूपृष्ठावर १ सहस्र ६०० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागतात. कंपन लहरींमुळे वर फेकला गेलेला ‘फायरबॉल’ ३० ते ३५ सेकंदांत अळंबीच्या आकाराचा होत जातो. त्याला ‘मशरूम क्लाऊड’ म्हणतात. ‘फायरबॉल’समवेत वर गेलेल्या भूमीवरील वस्तू, माती, धुरळा इत्यादी पदार्थ किरणोत्साराने दूषित होऊन खाली पडू लागतात. या किरणोत्सर्गी धुळीला ‘फॉलआऊट’ म्हणतात. ही धूळ वार्‍यासमवेत वाहून गेल्याने अनेक चौरस किलोमीटरच्या प्रदेशात पडू शकते. हा ‘फॉलआऊट’ भूमीवर येण्याचा कालावधी २ मिनिटांपासून २४ घंट्यांपर्यंतही कितीही असू शकतो. हा ‘फॉलआऊट’चा कालावधी स्वतःच्या रक्षणासाठी वापरता येऊ शकतो.

अणूबॉम्बचा आकार, स्फोट किती उंचीवर होतो, स्फोटाची वेळ, स्फोटाच्या वेळचे वातावरण इत्यादींवर त्याची दाहकता अवलंबून असते. उदा. १ मेगाटन स्फोटामध्ये आगीच्या लोळाचा व्यास २.२ किलोमीटर (१० मेगाटन – व्यास ५.५ किलोमीटर, २० मेगाटन – व्यास ७.४ किलोमीटर) असू शकतो.

अणूबॉम्बच्या स्फोटाचे प्रकार – 1.भूमीपासून १ लक्ष फूट वर आकाशात 2.भूमीवर किंवा भूमीच्या अगदी जवळ 3.भूमीगत 4.पाण्याखाली

ज्या ठिकाणी १० किलोटनचा ‘अणूबॉम्ब’ पडतो, तेथील सुमारे ०.८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सर्व गोष्टी क्षणार्धात जळून त्यांची वाफ होते. या भागाला ‘बाष्पीभवन बिंदू’ म्हणतात. अणूबॉम्बच्या स्फोटामुळे हवेचा प्रचंड दाब (१.७६ किलो/चौ.से.मी.) निर्माण होतो आणि ५१० किलोमीटर प्रतिघंटा वेगापेक्षा अधिक वेगाचे वादळ निर्माण होते. या वेळी भूमीला प्रचंड हादरे बसून ३ चौरस किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र उद्ध्वस्त होऊ शकते, तर ३० चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत जीवित आणि वित्त हानी होऊ शकते. ही हानी त्या ‘अणूबॉम्ब’च्या क्षमतेनुसार अल्प-अधिक होत असते’

अणूबॉम्ब पडलेल्या ठिकाणी अनेक वर्षे वनस्पतीही उगवत नाही. ‘अणूबॉम्ब’च्या स्फोटामुळे ३ किलोमीटरच्या पलीकडील क्षेत्रातील सर्व ज्वलनशील पदार्थ पेट घेतात आणि प्रचंड धूर निर्माण होऊन माणसे गुदमरतात. या वेळी ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन श्‍वसनात अडथळे येतात. यात ५० टक्के लोक संपूर्णतः घायाळ आणि १५ टक्के लोक मृत्यूमुखी पडतात. काही जणांना तात्पुरते किंवा काही जणांना कायमचे अंधत्वही येऊ शकते. ‘अणूबॉम्ब’च्या स्फोटानंतर जेव्हा त्याची किरणोत्सर्गी धूळ खाली येते, तेव्हा होणारा किरणोत्सर्ग शरिरातील पेशी नष्ट करू शकतो. मळमळ, उलट्या, जुलाब, कर्करोग इत्यादी आजार होऊ शकतात. स्फोटानंतर काही मिनिटे किंवा काही घंटे किंवा काही दिवस किरणोत्सर्ग उच्च पातळीवर म्हणजे सर्वाधिक असू शकतो आणि नंतर किरणोत्सर्ग अल्प म्हणजे विरळ होत जातो. तरीही या किरणोत्सर्गाचा परिणाम अनेक वर्षे दृश्य स्वरूपात दिसून येऊ शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी येथील ‘अणूबॉम्ब’च्या स्फोटानंतर झालेल्या किरणोत्सर्गाचा परिणाम पुढील अनेक वर्षे दिसून येत होता. तेथे जन्माला येणार्‍या मुलांवरही त्याचा परिणाम दिसून ते शारीरिकदृष्ट्या विकलांग किंवा रोगग्रस्त असत. ‘अणूबॉम्ब’ टाकण्यात आलेल्या ठिकाणी काही दशकांपर्यंत जनजीवन नष्ट होते. अणूबॉम्ब’च्या क्षमतेनुसार त्याच्या स्फोटापासून कित्येक किलोमीटर अंतरावर विद्युत् उपकरणे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांची हानी होऊ शकते. त्यामुळे पुढे तात्पुरते व्यत्यय किंवा अडथळे येऊ शकतात.

आज अनेक देशांकडे ‘अणूबॉम्ब’च्या तुलनेत अधिक मारक क्षमतेचे अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत, तसेच काही देश ‘अणूबॉम्ब’ वापरण्याची उघडउघड धमकीही देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अणूबॉम्बच्या संदर्भात माहिती घेण्याचे महत्त्व स्पष्ट होईल.

संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ.