न्यूयॉर्क (अमेरिका) – कोरोना महामारीच्या कालावधीत तब्बल ९८ देशांना कोरोनाची लस उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक देशांनी भारताला मन:पूर्वक धन्यवाद दिले होते. त्या काळात भारताच्या ‘वॅक्सिन मैत्री’च्या अंतर्गत हे साहाय्य करण्यात आले होते. आताही संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथे चालू असलेल्या महासभेत अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात भारताने आमच्या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद दिला ! – डॉ. विंस हेंडरसन, परराष्ट्रमंत्री, डॉमिनिका
या महत्त्वपूर्ण मंचावरून मी सांगू इच्छितो की, कोरोना महामारीच्या कालावधीत ‘आमच्या नागरिकांना यापासून कसे वाचवावे’, असा यक्ष प्रश्न आम्हाला पडला होता. तेव्हा आमच्या आवाहनाला भारताने तत्परतेने प्रतिसाद दिला. भारताने आम्हाला कोरोनाची लस पुरवली. आमच्यासारखा छोटा आणि गरीब देश, ज्याची अर्थव्यवस्था ही केवळ पर्यटनावर अवलंबून आहे, त्याला भारताने साहाय्य केले. मी वैयक्तिकरित्या भारतीय जनता आणि तेथील सरकार यांना मनापासून धन्यवाद देतो.
भारताने मानवतेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले ! – तांदी दोरजी, परराष्ट्रमंत्री, भूतान
भारताने ‘वॅक्सीन मैत्री’च्या माध्यमातून उचललेले हे मानवतेसाठीचे ऐतिहासिक पाऊल होते. भारताने जगातील १०० हून अधिक देशांना कोरोनाची लस पुरवली.
आर्थिक प्रगती करतांना भारत इतर देशांना विसरला नाही ! – मनीष गोबिन, खाद्य सुरक्षा मंत्री, मॉरिशस
वर्ष १९९० मध्ये भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. त्यामुळे भारत कुठल्या कुठे पोचला आहे. आर्थिक प्रगती करत असतांना भारत अन्य देशांना विसरलेला नाही. जागतिक निर्णय घेण्याच्या व्यासपिठावर भारत ‘ग्लोबल साऊथ’च्या (दक्षिण गोलार्धातील विकसनशील आणि गरीब देशांचा समूह) देशांना एकत्र आणत आहे. भारताने मॉरिशससारख्या देशाला जी-२० च्या व्यासपिठावर आणणे, हे त्याचेच एक उदाहरण होय.
कोरोना महामारीतून सावरण्यासाठी भारताने साहाय्य केले ! – अहमद खलील, परराष्ट्रमंत्री, मालदीव
भारत पुढील २५ वर्षांमध्ये जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. कोरोना महामारीमुळे आमच्या देशाला मोठा फटका बसला होता. त्यातून लवकर सावरण्यामागील एक कारण हे भारताने पुरवलेले साहाय्यही आहे. भारताखेरीज हे शक्य झाले नसते.