गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !

गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा – युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा – गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाची प्रार्थना, याचा प्रथम उद्‍गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व

रामाने वालीचा वध या दिवशी केला. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.

गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. ‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते.

गणेशयामल या तंत्रग्रंथात ‘नक्षत्रलोकातील (कर्मदेवलोकातील) २७ नक्षत्रांपासून निघालेल्या २७ लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभाग) होऊन पृथ्वीवर २७ x ४ = १०८ लहरी येतात’, असे सांगितले आहे. त्यांच्या विघटनाने यम, सूर्य, प्रजापति आणि संयुक्‍त अशा चार लहरी होतात. प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे, शरिरात कफप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात. यमलहरींमुळे पाऊस पडणे, वनस्पती अंकुरणे, स्त्रियांना गर्भधारणा होणे, गर्भाची व्यवस्थित वाढ होणे, शरिरात वायूप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात. सूर्यलहरींमुळे भूमीची उष्णता वाढून वनस्पती जळणे, चर्मरोग होणे, भूमीची उत्पादनक्षमता न्यून होणे, शरिरात पित्तप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात. संयुक्‍त लहरी म्हणजे प्रजापति, सूर्य आणि यम या तिन्ही लहरींचे मिश्रण. ज्या संयुक्‍त लहरींत प्रजापति लहरींचे प्रमाण जास्त असते, त्यांना प्रजापति-संयुक्‍तलहरी म्हणतात. अशाच रितीने सूर्य संयुक्‍त आणि यम संयुक्‍त लहरीही असतात.

गुढीसाठी प्रार्थना

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व
असे तयार करा कडुनिंबाचे चूर्ण (चटणी)

कडुनिंब

कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद तयार करावा व तो सर्वांना वाटावा. जो यजमान आहे त्याला ते रोगशांती, व्याधींचा नाश व्हावा आणि सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी (संपत्ती) लाभावी म्हणून भक्षण करण्यास सांगितले आहे. (संदर्भ आणि हे बनविण्याचा विधी हे प्रती संवत्सराच्या पंचागामध्ये उधृत केलेले असते.)

गुढी : महत्त्व आणि गुढीसाठी प्रार्थना !

गुढी लावल्याने वातावरणातील प्रजापति संयुक्‍त लहरी या कलशरूपी सूत्राच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे, म्हणजे प्रजापति लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति लहरी आपल्याला प्राप्त होतात. प्रजापति लहरींमध्ये प्रजापति लहरींचे ८० टक्के इतके प्रमाण असते, तर सूर्य, यम आणि संयुक्‍त या लहरींचे प्रमाण अनुक्रमे १०, ८ अन् २ टक्के इतके असते. संपूर्ण वर्षभरात इतर कोणत्याही काळात या लहरींचे प्रमाण इतके नसते. प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची जमिनीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे इत्यादी परिणाम होतात.

इतर दिवसांच्या तुलनेत गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणावर प्रक्षेपण होत असते. हे प्रक्षेपण ग्रहण करण्यासाठी गुढीपाडव्याला दारापुढे गुढी उभी केली जाते. गुढी लावल्याने तिच्या माध्यमातून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व घरात सहजपणे प्रवेश करू शकतात. ब्रह्मतत्त्वाने गुढीमध्ये प्रवेश केल्यावर गुढीला लावलेल्या फुलांच्या माळा, साखरेची माळ, तांब्याचा कलश आणि आंब्याची पाने यांमध्ये हे तत्त्व आकृष्ट होते आणि त्या वस्तू ब्रह्मतत्त्वाने संपृक्‍त होतात. यातील ग्रहण करण्यायोग्य वस्तू ग्रहण केल्यास अथवा वास्तूत ठेवल्यास त्यांचा लाभ जीवाला होतो आणि त्याच्या पेशीपेशीत ब्रह्मतत्त्व जाणे सोपे होते. दिवसभर (सूर्यास्तापर्यंत) दारापुढे गुढी उभी केल्यामुळे सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व दिवसभर घरात येत रहातात आणि साठवले जातात. याचा लाभ वास्तूत रहाणार्‍या आणि वास्तूत येणार्‍या जीवांना वर्षभर होतो. जीवाला ब्रह्मतत्त्वाकडून होणार्‍या सूक्ष्म-प्रक्षेपणाचा फायदा वर्षभर होण्यासाठी त्याच्यात किमान ४० टक्के भाव असणे अपेक्षित आहे. जीवात जेवढा भाव अधिक, तेवढा त्याला प्रत्येक सणाचा आणि ईश्‍वराकडून वेळोवेळी प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानलहरी, शक्‍ति, चैतन्यलहरी, सत्त्वलहरी आणि विशिष्ट देवतेच्या तत्त्वलहरी यांचा पुरेपूर लाभ घेता येतो.

युद्ध आणि गुढी यांचा संबंध

युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी करण्याचे कारण

गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी ‘यश’ या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

युद्धात गुढीचा वापर केल्याने उच्च देवतांचा तत्त्वरूपी आशीर्वाद प्राप्त होणे

अशा प्रकारे गुढीला लावलेल्या वस्त्राप्रमाणे त्यातून आवश्यकतेनुसार शक्‍ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरी प्रक्षेपित होऊन सर्वांना लाभ होतो. उच्च लोकांतून ब्रह्मांडात प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्मतम स्तरावरील लहरी गुढी लावल्याने तिच्यात आकृष्ट होऊन त्याचा देवसैनिकांना लाभ होतो. गुढी लावल्याने तिच्यातून मिळणार्‍या चैतन्याच्या बळावर देवसैनिक महा-असुरांशीही निर्भयपणे युद्ध करून विजयी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेव, महादेव आणि श्रीविष्णू यांच्या देवतांना लाभणार्‍या आशीर्वादात्मक तत्त्वलहरींमुळे उच्च देवतांचा युद्धात अप्रत्यक्ष सहभाग असतो.

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. हल्ली काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराचे तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते, हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत. यावरून आपल्या संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रत्येक कृती धर्मशास्त्रानुसार का करावी, हे ही लक्षात येईल !

तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्‍तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्‍त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्‍ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.

तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.

कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्‍या शिव-शक्‍तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.

गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची गती ही उसळणार्‍या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते. – सूक्ष्म जगतातील एक विद्वान

सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी ‘ब्रह्मध्वजपूजन’ करतात

सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी ‘ब्रह्मध्वजपूजन’ करतात आणि तेव्हापासून रामनवरात्र चालू होते. ब्रह्मध्वजाला हिरवी साडी किंवा निळे कापड अथवा भगव्या वर्णाची साडी, भगवे वस्त्र नेसवतात आणि हे परंपरेला धरून आहे. पूर्वी सुवर्ण किंवा चांदीचे पात्र हे गुढीवर पालथे घातले जाई. पूर्वी देवघरातील देवतांची पात्रे ही चांदीविना इतर कोणत्याही धातूची नव्हती. ही जुनी परंपरा रिक्त होत असून कालातरांने चोर्‍या वाढल्या आणि संस्कृती र्‍हास म्हणून चांदीचे भांडे ठेवणे बंद झाले. त्यामुळे सध्या तांब्याचे भांडे वापरले जाते. खरेतर सुवर्ण, चांदी आणि कांस्य यांचा वापर व्हायला हवा; पण ते शक्य नसल्याने तांबे वापरले जाते. ‘स्टील’ किंवा ‘प्लास्टिक’ यांचा वापर पूजनामध्ये करता कामा नये. गुढीवर भांडे पालथे ठेवल्याने त्याद्वारे ब्रह्मदेवाच्या लहरी अधिकाधिक ग्रहण करता येतात. ब्रह्मध्वजपूजनाविषयीची माहिती ‘धर्मसिन्धु’ या ग्रंथामध्येही उपलब्ध आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात / सनातन संस्था संकेतस्थळ – sanatan.org